शीझानला मिळणार पासपोर्ट; वसई कोर्टाने अर्ज केला मंजूर

Actor Sheezan Khan
संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी शीझान खानला पासपोर्ट परत देण्याचे आदेश वसई कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. एका हिंदी मालिकेच्या चित्रिकरणासाठी शीझानला परदेशात जायचे आहे.

तुनिषाच्या आत्महत्येनंतर शीझानला पोलिसांना अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट पण जप्त केला. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच शीझानला जामीन मंजूर केला. पोलिसांनी जप्त केलेला पासपोर्ट परत मिळावा यासाठी शीझानने वसई कोर्टात अर्ज केला होता. शीझानचा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जामीनावर असलेल्या आरोपीला काम करण्याची मुभा आहे. परिणामी शीझानला पासपोर्ट देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी शीझानच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने शीझानची मागणी मान्य केली.

शीझान खानला डिसेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शीजान खान पोलिसांच्या ताब्यात होता. अनेक जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शेवटी 70 दिवसानंतर 4 मार्च 2023 रोजी शीझानची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली. अनेक दिवसांपासून शीझानच्या जामीनाचा अर्ज फेटाळला जात होता. त्याचे कुटुंबीय आणि वकील त्याला सोडवण्याचे अनेक प्रयत्न करत होते.

मला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ कळतोय अशी प्रतिक्रिया शीझानने तुरुंगातून बाहेर आल्यावर दिली होती. आज खऱ्या अर्थाने मला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला आहे. आज मी स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा माझ्या आईला आणि बहिणीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पण आता मी माझ्या हक्काच्या माणसांसोबत असल्याने मला समाधान आहे, असे शीझानने एका मुलाखतीत सांगितले.

‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या हिंदी मालिकेत तुनिषा आणि झीशान मुख्य भूमिका साकारत होते. मालिकेच्या सेटवर तुनिषा-शीझान एकत्र आले. तेव्हापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, आत्महत्येपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता असं म्हटलं जात आहे. ब्रेकअपमुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप शीझानला करण्यात आला आहे.