शेकापचे धैर्यशील पाटील यांनी लाल बावट्याची साथ सोडली, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही गमावल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांमधला आत्मविश्वास आता हळुहळू डगमगू लागलाय, असं चित्र दिसतंय.

Dharisheel-Patil-In-Bjp
पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही गमावल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांमधला आत्मविश्वास आता हळुहळू डगमगू लागलाय, असं चित्र दिसतंय.

शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडमधून महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का देण्यात आलाय. पेण मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे भाजपात पक्ष प्रवेश करणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. शेकापचे धैर्यशील पाटील यांनी लाल बावट्याची साथ सोडली असून उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून शेकाप आता कुठे सावरत पुन्हा आगामी निवडणूकीच्या मैदानात उभा राहण्याच्या तयारीत असताना भाजपनं शेकापला आणखी एक मोठा धक्का दिलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला आणखी कमजोर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महाविकास आघाडीचे काही आमदार फोडण्याची भाजपाची योजना आहे. रायगडमधल्या पेण मतदारसंघात भाजपाला यश मिळालं आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी पेणचे आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी धैर्यशील पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४ साली मी धैर्यशील पाटील यांना भाजपात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण त्यावेळी मी अयशस्वी ठरलो. पण आज ते शक्य झालंय. धैर्यशील पाटील यांनी पक्ष जरी बदलला असला तरी विचार तेच असणार आहेत.” यापुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपला पक्ष इतका मोठा आहे की सगळ्यांना संधी आहे, कुणाची संधी डावलली जाणार नाही, सगळ्यांच्या त्यांच्या ताकदीनुसार संधी मिळेल,” असं आवाहन देखील केलंय.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांचा आत्मविश्वास एकीकडे दुणावलेला असताना, दुसरीकडे भाजप पक्षही त्यांच्या बरोबरीने वरचढ ठरताना दिसतोय. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही गमावल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांमधला आत्मविश्वास आता हळुहळू डगमगू लागलाय, असं चित्र दिसतंय. याचीच प्रचिती शेकापच्या बालेकिल्ल्यात दिसून येत आहे.

यापूर्वी रायगडमधीलच पालीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबागमधील शेकापचे दिलीप भोईर यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर आता पेणमधून धैर्यशील पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर रायगडमधील लोकसभेसाठी धैर्यशाली पाटील यांना उमेदवारी मिळण्याबाबत चर्चा जोरात सुरूय.