शिंदे सरकार हे वॉशिंगमशिन नाही विकासात्मक काम करणारे गतिमान सरकार – भूषण देसाई

मुंबई : ठाकरे कुटुंबाचे निष्ठावान आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आज (13 मार्च) प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी भूषण देसाईंचे स्वागत केले आहे. यावेळी भूषण देसाईंनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार हे विकासात्मक काम करणारे गतिमान सरकार आहे. आदित्य ठाकरेंच्या वॉशिंग मशिनच्या आरोपांवर भूषण देसाई म्हणाले, मला काही तसे वाटत नाही. हे काम करणारे, गतीमान सरकार असल्याचं भूषण देसाईंनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईं यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रताप सरनाईक उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभेचे अधिवेशन सुरु असतानाच हा कार्यक्रम सुरू आहे. आज भूषण देसाई यांचं मी शिवसेनेत स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार या राज्यात स्थापन झाले आहे. बाळासाहेबांची भूमिका आणि विचार पुढे नेण्याचे काम आम्ही आणि शिवसैनिक करतो आहोत. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्यामुळेच भूषण देसाई आमच्यासोबत आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विविध पक्षातले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस ५० आमदार आणि १३ खासदारांसोबत शेकडो नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर आमच्यासोबत काम करू लागले. जेव्हा सरकार स्थापन झाले तेव्हा अनेक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी आम्ही घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि खासदार गजानन किर्तीकर ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केले त्यांनी सुद्धा आम्हाला समर्थन दिले. सुरुवातीला रामदास कदम, आनंदराव अडसुळे, प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर ज्यांनी बाळासाहेबांसोबत शिवसेनेचे नेते म्हणून काम केले त्यांनी आम्हाला साथ दिली. ही प्रक्रिया आता निरंतर सुरू आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये विकासाची कामे करतो आहोत. या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केले आहे. या अर्थसंकल्पावर नजर टाकली तर सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे प्रतिबिबं त्या अर्थसंकल्पात देखील उमटल्याचे दिसेल.

एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाई शिवसेनेचा भगवा रुमाल घालून त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला

जे निर्णय आम्ही घेतो आहोत, त्यात मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे सर्व सहकारी, शिवसेना भाजपा युतीचे सर्व लोकप्रतिनिधी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निर्णय घेतो आहोत. गेल्या सहा सात महिन्यात मुंबईचे रुपडे आम्ही पालटले आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर, सुशोभित, रोषणाईयुक्त केली असून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कोळीवाड्याचा विकास असे अनेक प्रकल्प आम्ही हाती घेतले आहेत. हे सर्व काम खऱ्या अर्थाने मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे अनेक वर्ष होती, त्यांना ते करता आले नाही. मुंबईला अनेक वर्षे खड्ड्यातून प्रवास करावा लागला. अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांमध्ये भावना निर्माण झाली की लोकांसाठी काम करणारे जे लोक आहेत ते या सरकारमध्ये आहेत. मुंबई आंतराराष्ट्रीय शहर आहे. आपण पाहता जे काही काम सुरू आहे ते तुमच्या समोर आहे.

 

बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची भूमिका लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी मला सांगितले की मला तुमच्या सोबत काम करायचे आहे. भूषण देसाई यांनी निर्णय घेतला की काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचे आणि खऱ्या अर्थाने विकासाभिमुख निर्णय घेणारे सरकार म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी विकास डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. त्यांना मुंबईमध्ये काम करायचे आहे. इतरही ठिकाणी त्यांच्या संपर्कात खूप लोक आहेत. त्यांना न्याय देण्याचे काम याठिकाणी आम्ही करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाईंना दिला.

भूषण देसाई काय म्हणाले
आयुष्यभरात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांशिवाय माझ्यासमोर दुसरे काहीही आलेले नाही. बाळासाहेबांचे हिंदूत्ववाद शिंदे पुढे घेऊन जात आहेत, वाढवत आहेत. आम्ही एकत्र काम केल्यामुळे मी त्यांना काम करताना जवळून पाहिले आहे. त्यांचा कामाचा वेग, त्यांची निर्णय क्षमता आणि इथे सर्वसामान्य जनतेला जो कार्यभार पाहायला मिळतो. तो मी जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मी निर्णय घेतला आहे, असे भूषण देसाई म्हणाले.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई

भूषण देसाईंचा शिवसेनेशी काही संबंध नाही, असा आरोप ठाकरे गटाकडून होत असल्याच्या प्रश्नावर भूषण म्हणाले, माझे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम सुरु आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांना मी काही म्हणणार नाही. मात्र शिंदे सरकारचे काम बघून मी त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. सुभाष देसाई यांच्यासोबत यासंबंधी माझे बोलणे खूप आधी झाले होते, असेही भूषण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले, जेव्हा शिंदेंचे सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच मी त्यांच्यासोबत जाण्याचा विचार व्यक्त केला होता. निवडणूक किंवा कोणतेही पद यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आलेलो नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
आदित्य ठाकरेंनी भूषण देसाईंना वॉशिंगमशीनमध्ये जाण्याची टीका केली होती, यावर उत्तर देताना भूषण देसाई म्हणाले की, मला ही वॉशिंग मशिन वाटत नाही, इथे विकासात्मक काम होते. म्हणून मी इथे आलो आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात भूषण देसाई म्हणाले.