घोडेबाजार रोखण्यासाठी बहुमत चाचणीचाच पर्याय, शिंदे गटाचा युक्तिवाद

Legislative Assembly

मुंबई : शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारला दिले आहेत. याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर सुनावणी सुरू असून बंडखोर आमदार एकनाथ खडसे यांचे वकील नीरज कौल युक्तिवाद करत आहेत. घोडेबाजार रोखायचा असेल तर, बहुंमत चाचणी हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंघवी, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडून नीरज कौल तर, राज्यपालांच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद करत आहेत. नबम रेबिया यांच्या निकालाचा दाखला देऊन नीरज कौल म्हणाले की, उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय व्हायला हवा. मात्र तूर्तास बहुमत चाचणी घेण्याचे लांबवू नये. घोडेबाजार होऊ नये, म्हणून ही चाचणी होणे आवश्यक आहे. अनेकांचे राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल. सदस्यांची अपात्रता हा मुद्दा नाही. बहुमत चाचणी ही लोकशाही मजबूत करणारी बाब, असे सुप्रीम कोर्टानेच म्हटले असल्याचे ते म्हणाले.

तसेच अविश्वास प्रस्ताव असलेले उपाध्यक्ष नोटीस कशी देऊ शकतात, असा सवाल करतानाच दोनच दिवसांपूर्वी बरे झालेले राज्यपाल इतक्या तत्परतेनं निर्णय कसा घेतात, हा प्रश्नच चुकीचा आहे. आजारातून बरी झालेली व्यक्ती बसून राहील का? आपल्या घटनात्मक कर्तव्य पार पाडू शकत नाही का?, असा युक्तिवाद त्यांनी केला.

एकूण किती आमदार असंतुष्ट आहेत आणि कितींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी विचारणा न्यायालयाने केली असता 39 आमदार असंतुष्ट असून 16 जणांना नोटिसा दिल्या असल्याचे कौल म्हणाले.

तर, शिवसेनेकडे फक्त 16 आमदार आहेत. आमचे 39 आमदार असल्याचे शिंदे गटाचे अन्य एक वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले.