शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल करणारा ठाकरे गटाचा – शंभूराज देसाईंची माहिती

मुंबईः शिवसेना आमदार शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी विनायक डावरे हा ठाकरे गटाचा सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक आहे. त्याने हा व्हिडिओ मातोश्री फेसबुक पेजवरून व्हायरल केला, अशी माहिती गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

व्हिडिओ मॉर्फिंग केल्याप्रकरणी वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे, अशी घोषणाही मंत्री देसाई यांनी विधानसभेत केली. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी विनायक डावरे हा ठाकरे गटाचा सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक आहे. त्याने हा व्हिडिओ मातोश्री फेसबुक पेजवरून व्हायरल केला. इतर आरोपींनीही तो व्हिडिओ व्हायरल केला, अशी कबुली दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे. याच्या तपासासाठी माहिती आणि तंत्रज्ञान व सायबर सेलची सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. याचा सखोल तपास सुरु आहे. मात्र असे प्रकार टाळता यावे यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. म्हणूनच वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.

या घटनेचे निवेदन मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सादर केले. आयपीसी कलम ३५४ अ, ५००, ३४, ५०० अ आणि माहिती आणि तंत्रज्ञन कलमांतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक राजदेव मिश्रा(४५), मानस अनंत कुंवर(३०), विनायक भगवान डावरे( २६) आणि रविंद्र बबन चौधरी(३४) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच राज प्रकाश सुर्वे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चार मोबाईल व सिमकार्ड जप्त केले आहेत. हा व्हिडिओ मॉर्फ व एडिटींग केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. न्यायालयाने आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान भवनात दिली.

सोशल मीडियावर आमदार शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.