हिंदुत्वासाठी शिवसेना – भाजप एकाच व्यासपीठावर; निमित्त ‘हिंदू एकता दिंडी’चे

Shiv Sena and BJP leaders came together for Hindu Ekta Dindi
Shiv Sena and BJP leaders came together for Hindu Ekta Dindi

मुंबईसह महाराष्ट्रात व देशातही हिंदुत्व, भगवे वातावरण, हिंदुत्ववावरून आरोप- प्रत्यारोप याला जोरदार उधाण आले आहे. हिंदुत्ववावरून मनसेचे नेते राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. तर याच हिंदुत्वावरून शिवसेना व भाजप एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेने काढलेल्या निमित्त ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये, एकमेकांचे राजकीय शत्रू बनलेल्या शिवसेना व भाजपचे नेते, पदाधिकारी हे एकाच व्यासपीठावर आले.

फरक एवढाच होता की, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे ‘हिंदू एकता दिंडी’च्या प्रारंभी उपस्थित होते. त्यावेळी, भाजपचे काही पदाधिकारीही उपस्थित होत. तर, शिवसेनेचे महादेव देवळे ( माजी महापौर) हे सेना भवन येथे दिंडीत सहभागी झाले होते. तर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर हे या दिंडीच्या समाप्तीप्रसंगी उपस्थित झाले होते.

वास्तविक, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मुंबईतील कबुतर खाना ते दादर शिवाजी पार्क परिसरात शनिवारी ही ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली होती. यावेळी, उपस्थित सर्व हिंदूंनी पक्ष, जातीभेद यांना तिलांजली देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा हुंकार दिला. या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयांतील ५०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते. सनातन संस्थेच्या सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू.(सौ.) संगीता जाधव, वसई (मेधे) येथील परशुराम आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदू एकता दिंडी’ची सांगता –
हिंदुत्वाचा एल्गार ‘हिंदू एकता दिंडी’ची सांगता शिवाजी पार्कजवळील चौकात झाली. यावेळी, शिवसेना आमदार दिवाकर रावते व भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाषण केले नाही. मात्र, सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आवाहनानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या आहेत. हिंदु एकत्र येतात तेव्हा विश्वकल्याण साधले जाते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमध्ये एकता निर्माण व्हायला हवी, असे मत मांडले. योग वेदांत सेवा समितीचे विनोद मिश्रा, हिंदु गोवंश रक्षा समितीचे दिप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे बळवंत पाठक आदी मान्यवर वक्त्यांनीही हिंदूसंघटनाची आवश्यकता अधोरखित करून एकत्रितपणे राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याचे आवाहन केले.

तसेच,या हिंदू एकता दिंडीत हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय बजरंग दल, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदू हेल्पलाईन, भारत स्वाभिमान, भगवा गार्ड, स्वतंत्र सवर्ण सेना, अखिल भारतीय ब्राह्मण विकास परिषद, अखिल भारत हिंदु महासभा, हिंदू टास्क फोर्स, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु जनजागृती समिती, हिंद सायकल आणि शिवडी मार्केट गणेशोत्सव मंडळ आदी हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना आणि मंडळे तसेच योग वेदांत सेवा समिती, गायत्री परिवार, वारकरी संप्रदाय, पतंजली योग समिती, श्री राज मरूधर जैन संघ (दादर), वामनराव पै संप्रदाय, माँ शक्ती सामाजिक संस्था आदीनी सहभाग घेतला.