शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी

रामदास कदम यांचा पत्ता कट

विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेने एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणार्‍यांना धडा शिकवला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणार्‍या सुनिल शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्याविरोधात भाजपला रसद पुरवणार्‍या रामदास कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेने मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनिल शिंदेंना उमेदवारी दिली आहे. सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर सेनेकडून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात येत आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे आणि परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुरावे दिल्याचा आरोप आहे. एवढेच नाहीतर रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर नाराज होते. अखेरीस ऑडिओ प्रकरण रामदास कदम यांच्या चांगलेच अंगी आले आहे. शिवसेनेने विधान परिषदेसाठी कदमांचा पत्ता कट केला आहे.

शिवसेनेने एकाप्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्याला सन्मान करत पक्षासोबत निष्ठा न राखणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात रामदास कदम काय निर्णय घेता हे पाहण्याचे ठरणार आहे.