ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते अनंत वामन तरे यांचे वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, जावई , सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनंत तरे हे कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले होते. त्यानंतर, त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांना ठाण्यातील एका नामांकित रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरू असताना, त्यांची सोमवारी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. 1992 साली तरे हे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून आले. तसेच 31 मार्च 1993 साली ते ठाणे महापालिकेचे महापौर झाले. त्यावेळी 11 अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने प्रबळ असणार्या व्यक्तीला महापौरपदाची उमेदवारी देणे गरजेचे होत. त्यावेळी शिवसेनेतून अनंत तरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.
त्यानंतर 1994 आणि 1995 साली असे सलग तीनवेळा त्यांनी ठाण्याचे महापौरपद भूषवले. ठाणे महापालिका महापौरपदाची हॅट्ट्रिक साधणारे ते एकमेव असून त्यावेळी महापौरपदासाठी एक वर्षाची मुदत होती. त्यांना दोन वेळा रायगड येथून लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. 1997 साली शिवसेनेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर 2000 साली त्यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली होती. तसेच 2006 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून त्यांना डावलून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नारायण राणे यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने थेट शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवत भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण अवघ्या 24 तासात मातोश्रीवर बोलावून घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी दूर केल्यावर उमेदवारी मागे घेत, पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले. त्यातच ते कोळी समाजाचे नेते म्हणून राज्यात ओळखले जात होते. तसेच लोणावळा, कार्ला येथील एकविरा देवी देवस्थानचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले आहे. तरे हे ठाण्यातील राहत्या घराबाहेर कित्येक वर्षे प्रत्येक दिवाळीत साधू संतांना दानधर्म करत होते. त्यामुळे दिवाळीत दूरहून साधू संत ठाण्यात येत असत. मात्र, कोरोना काळात त्यांनी दानधर्म सोहळा रद्द केला होता.
अखेर दोन महिन्यांची झुंज संपली
2020 या वर्षाच्या अखेरीस त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते सुखरूप बाहेर आले. याचदरम्यान घरी आल्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मागील दोन महिने ते मृत्यूशी झुंज देत होते. त्यातच तरे यांची प्राणज्योत सोमवारी दुपारी मालवली.