घरताज्या घडामोडीशिवसेनेची झोप उडाली; ड्रग्ज प्रकरणात बड्या नेत्याच्या मुलाची मुंबई पोलिसांकडून चौकशी

शिवसेनेची झोप उडाली; ड्रग्ज प्रकरणात बड्या नेत्याच्या मुलाची मुंबई पोलिसांकडून चौकशी

Subscribe

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटिंना NCB ने समन्स पाठविल्यानंतर शिवसेना नेत्याच्या मुलालाही मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेता घेता ड्रग्जच्या व्यसनाधितांचे जाळे अलगद मुंबई पोलीसांच्या हाती लागले आहे. शिवसेनेच्या एका वजनदार उपनेत्याच्या मुलाला पोलीसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर युवासेनेचा पदाधिकारी ड्रग्ज व्यापार प्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याच्या बातमीने सेनानेत्यांची झोप उडाली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी जी शोधमोहीम सुरू केली. त्याला सीबीआयने दिलेल्या जोड तपासानंतर मादक द्रव्यांचा व्यापार आणि शहरातील ड्रग्जची तस्करी प्रकाशात आलेली आहे. अनेक बडी धेंडं या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामध्ये राजकीय नेते, अभिनेते, बिल्डर, फॅशन विश्वातील मान्यवर यांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी शिवसेनेच्या एका वजनदार उपनेत्याच्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दुबईमध्ये एका आलिशान परिसरामध्ये निवासस्थान असलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाला दक्षिण मुंबईतून निवडणुकीचे वेध लागले आहेत. पुढील महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी युवा सेनेचा पदाधिकारी असलेल्या या तरुण कार्यकर्त्यांने कंबर कसली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर मुंबई पोलीस, सीबीआय आणि नारकोटिक्स विभागाने सुरू केलेल्या शोध मोहिमेमध्ये पोलिसांचा चौकशीचा फेरा या युवा पदाधिकाऱ्यावर पडलेला आहे. पोलीसांच्या या चौकशीनंतर शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई राजकीय असल्याचे सुरुवातीला भासवण्यात आले. मात्र पोलिसांकडे असलेल्या धक्कादायक माहिती नंतर सेनानेत्यांची झोप उडाली आहे.

- Advertisement -

घरीच नगरसेवक आणि आई आमदार असल्याने सक्रिय राजकारणात असलेल्या या युवा पदाधिकाऱ्याने काही काळ यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरल्यानंतर त्याने महापालिकेच्या माध्यमातून राजकारणात जम बसवण्याचे आडाखे बांधले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वर्तुळात या ना त्या कारणाने शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दक्षिण मुंबईतील वजनदार राजकीय कुटुंबाला पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याने जोरदार दणका बसला आहे. पोलिसांनी तासभर केलेल्या या युवा पदाधिकाऱ्याच्या चौकशीमध्ये दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल समाजात असलेली त्याची ऊठबस, दुबईतल्या फेऱ्या, दुबईतलं घर आणि वजनदार नेता असलेल्या वडिलांच्या आखाती देशातील मित्रपरिवार या बाबत पोलिसांनी चौकशी केल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात संशयाचे ढग युवासेना प्रमुखांवर जमा झाल्यानंतर अनेक स्वार्थी मित्रांनी आणि धंदेवाईक मित्रांनी त्यांच्यापासून फारकत घेतली आहे. हीच वेळ साधत या ना त्या कारणाने मातोश्रीच्या युवा वर्तुळात आपल्या चिरंजिवाला जागा करून देण्याचा प्रयत्न चाणाक्ष उपनेत्यांने केल्याचे काही काळ बोलले गेले. मात्र रात्री उशिरा या चौकशीतील गंभीर तपशील समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बडे पोलीस अधिकारी हे या तरुण मुलाबाबत नेमकी काय पावले उचलतात आणि या चौकशीच्या धाग्यादोऱ्यातून आणखी कोणा कोणापर्यंत पोलीस आणि नार्कोटिक्स तपास पोहोचतो? याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. याआधी पश्चिम उपनगरातील माजी आमदार असलेल्या काँग्रेस नेत्याच्या मुलाचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -