घरCORONA UPDATEशिवसेना शाखेत आता कोरोनावर उपचार, ऑक्सिजन सेंटरची सुविधा उपलब्ध

शिवसेना शाखेत आता कोरोनावर उपचार, ऑक्सिजन सेंटरची सुविधा उपलब्ध

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईच्या शिवसेना शाखांमध्ये दवाखाने सुरु करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुंबईतील विविध भागांमध्ये शाखांमध्ये दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. दहिसरमधील प्रभाग ३ आणि ४ च्या शिवसेना शाखांमध्ये हे दवाखाने सुरु करण्यात आले आहे. शाखा क्रमांक ४ मध्ये शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर आणि शाखा क्र. ३ मध्ये नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांच्या पुढाकाराने त्यांच्या शाखांमध्ये हे दवाखाने सुरु करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली, दहिसर, मागाठाणे विभागात शाखेतील दवाखाने सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर आणि प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या पुढाकाराने रावळपाडा येथील शिवसेना शाखा क्र. ४ मध्ये शाखेतील दवाखान्याचा शुभारंभ शिवसेना सचिव सुरज चव्हाण, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तर प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या पुढाकाराने शाखा तिथे दवाखाना या अभिनव उपक्रमाचा शुभारंभही विभागप्रमुख आणि आमदारांच्या हस्ते पार पडला.

shiv sena shakha clinic 1
शिवसेना शाखेत कोविड दवाखाने

या दवाखान्याचे वैशिष्ट म्हणजे याठिकाणी विनामूल्य आरोग्य तपासणी, मोफत औषधांबरोबर कोविड संशयित रुग्णाकरीता ऑक्सिजनची सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असते व रुग्णालयात बेडची व्यवस्था होईपर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित न ठेवल्यास रुग्णाची अवस्था गंभीर होण्याची शक्यता असते. याच करिता शिवसेना शाखा क्र. ४ मध्ये डॉ. सलिल सावंत यांच्यासह परीचारिका तैनात करुन चार ऑक्सिजनच्या सुविधेसह बेडस् उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे विभागातीतील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

तर दहिसर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकरिता नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर यंत्रणा भेट देण्यात आली. या दवाखान्याच्या लोकार्पण प्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त पाटिल, दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुजावर, उपविभागसंघटक मीना पानमंद, शाखाप्रमुख राजू मुल्ला, शाखासंघटक उषा कोरगांवकर उपस्थित होते.

तर शाखा क्रमांक ३ मध्ये रुग्णाची ऑक्सिजन पातळी संतुलित राहावी याकरिता खास ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आली आहे. नगरसेवक निधीतून या दवाखान्यात कॉन्सनट्रेटर यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. डॉ. राकेश मांडवकर व परिचारिका सुनीता बेडगे, साजीदा शेख आदींच्या मदतीने या दवाखान्यात मोफत वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्याचे बाळकृष्ण ब्रीद यांनी सांगितले. या शुभारंभ प्रकरणी परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, दहिसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एम मुजावर, डॉ. भावीन खंबाटी, उपविभागप्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी उपस्थित होते.

तर शिवसेना शाखा क्र. ११ मध्ये स्थानिक नगरसेविका रिध्दी भास्कर खुरसुंगे यांच्या प्रयत्नातून दवाखाना उभारण्यात येत आहे. याठिकाणी डॉक्टर, परिचारिकांसह ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शुक्रवारी ३ जुलै रोजी येथील दवाखान्याचा शुभारंभ विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्याहस्ते होणार आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या शाखा या न्यायमंदिर म्हणून ओळखल्या जायच्या. पण आता याच शाखा आरोग्यमंदिर म्हणून ओळखल्या जातील, असे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -