दादर, माहिम, प्रभादेवीतले शिवसेनेचे दहिहंडी उत्सव रद्द!

warning of agitation by mns in ambernath
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीव दादर, माहिम, प्रभादेवी, वडाळा, धारावी येथील शिवसेना पक्षाच्या वतीने प्रतीवर्षी आयोजित करण्यात येणारे सर्व दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असून त्यावरील खर्चाची रक्कम कोविड रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमधील युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दहिहंडीसह दादर-प्रभादेवीतील प्रमुख आकर्षण असलेल्या शिवसेनेच्या मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाणार नाही. दक्षिण मध्य मुंबईतील दादर-माहिम, वडाळ आणि धारावी या तीन विधानसभा क्षेत्रांचे शिवसेना विभागप्रमुख आणि आमदार सदा सरवणकर यांनी ही घोषणा केली असून या सर्व भागांमध्ये दरवर्षी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यंदा साजरा न करण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येक शिवसेना शाखांना आणि संलग्न मंडळांना केले आहे.

तिन्ही विधानसभांमध्ये शिवसेना शाखा तसेच शिवसेनेच्या संलग्न मंडळांच्या वतीने सुमारे ३०० दहीहंडींचे आयेाजन केले जाते. तसेच शिवाजीपार्क येथे युवा सेनेच्या वतीने मोठ्या दहिहंडीच्या आयोजनासह दादर रेल्वे स्थानकासमोरील रानडे मार्गावरही मोठ्या रकमेच्या हंडीचे आयोजन केले जात असते. परंतु यंदा कोरोनाचे सावट असून त्यातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हंडीचे आयेाजन केल्यास त्यामुळे गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. परिणामी कोरोनाचा आजार जास्त प्रमाणात पसरण्याची भिती आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने अथक प्रयत्न करत मोठ्या प्रमाणात पसरणारा हा आजार नियंत्रणात आणला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे एक वर्षी उत्सव न करता हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिका आणि पर्यायाने राज्य सरकारला मदत करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तिन्ही विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा तसेच शिवसेना संलग्न मंडळांना कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता यावर्षी हंडीचे आयोजन न करता यावरील खर्चाची रक्कम कोविड रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहन केले असल्याचे विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.