घरताज्या घडामोडीशिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्वाळा

शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्वाळा

Subscribe

राज्यातील प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी निधी राखीव ठेवण्यात येणार असल्याच्या निर्णयाचा दाखला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत शिवसेनेने हिंदुत्व सोडले नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करताना शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपने चालवली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना भाजपची टीका खोडून काढली.

मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला इशारा

जो आपल्‍याला आवडता असतो त्‍याच्याविरोधात हक्‍कभंग टाकणाऱ्या आमदार प्रताप सरनाईकांच्या विरोधात ईडीची चौकशी लावली जाते. हे विकृत राजकारण आहे. कोणीही उठावे आणि टपली मारावी हे आम्‍ही अजिबात सहन करणार नाही. आम्‍ही असले विकृत राजकारण करत नाही आणि अशा राजकारणाला थाराही देणार नाही, असा इशाराही उद्धाव ठाकरे यांनी भाजपला दिला.

- Advertisement -

..ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्‍का लागणार नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आता न्यायालयात आहे आणि ती आम्‍ही जिंकणारच, असा ठाम विश्वास व्यक्‍त करतानाच मराठा समाजाला त्‍यांचा हक्‍क देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कणभरही धक्‍का लागणार नाही, याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. कोरोना सध्या आटोक्‍यात येत असला तरी कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नसल्‍याचेही ते म्‍हणाले.

मराठा आरक्षणाची लढाई आपण जिंकल्‍याशिवाय राहणार नाही

मराठा आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. विविध मराठा संघटनांसोबत मी स्‍वतः आणि अशोक चव्हाण यांनी सातत्‍याने चर्चा केली आहे. मराठा आरक्षणाची ही लढाई आपण जिंकल्‍याशिवाय राहणार नाही. पण दरम्‍यानच्या काळात कोणाच्या तरी सडक्‍या मेंदूतून अफवा निघाली की, ओबीसींच्या आरक्षणाला यातून धक्‍का लागणार आहे. पण मी मुख्यमंत्री म्‍हणून ग्‍वाही देतो की, मराठा समाजाच्या हक्‍काचे देत असताना ओबीसी समाजाच्या हक्‍काचे कणभरही काढून घेण्यात येणार नाही. समाजात जर कोणी अशा प्रकारे आग लावायचा प्रयत्‍न करणार असेल तर त्‍याच्यावर आम्‍ही पाणी टाकूच पण राज्‍यातील जनताही त्‍याच्यावर पाणी टाकल्‍याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.

- Advertisement -

पर्यावरणाला राखूनच विकास हेच सरकारचे धोरण

आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला बनविण्यावरून विरोधी पक्षनेत्‍यांनी टीका केली. सध्या हा विषय न्यायप्रविष्‍ट असल्‍याने आपण फार बोलणार नाही. मात्र पर्यावरणाचा समतोल राखूनच विकास करणे आमच्या सरकारचे ध्येय असणार आहे. प्रकल्‍प म्‍हटले की विरोध होतातच, पण त्‍यातूनच मार्ग काढून पुढे जायचे असते. यात राजकारण करण्यात येऊ नये. मुंबई आणि महाराष्‍ट्राच्या हिताचे जे असते तिथे राजकारण करू नये. बुलेट ट्रेन कोणाच्या हिताची आहे? महाराष्‍ट्राला तिचा काही फायदा आहे का? केवळ चार स्‍टेशन आपल्‍या वाटयाला येतील. पण त्‍यासाठी मोक्‍याची जागा दिली ना? तिचा वापर महाराष्‍ट्रासाठी अधिक चांगल्यारितीने करता आला असता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

फडणवीस यांनी दिल्‍लीला जावे ही मुनगंटीवारांची इच्छा

विरोधी पक्षनेते मोठा विचार करतात. ते दिल्‍लीला जावेत अशी अनेकांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवारांची पण तीच इच्छा आहे, असा चिमटा ठाकरे यांनी काढला. त्‍यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्‍यांनी अनेकांच्या कुंडल्‍या पाहिल्‍या. नंतर मुहूर्त काढायला लागले. आता सरकार पडणार की मग पडणार. पण कुंडल्‍या फक्‍त वाचता येतात त्‍या बदलता येत नाहीत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला.


हेही वाचा – राज्यातले ४३ पैकी ३८ मंत्री कर्जबाजारी,पाच मंत्र्यांवर कर्ज नाही – सुधीर मुनगंटीवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -