घरमुंबईआमच्यात वैर कधीच नव्हते; सामनातून शिवसेनेची सारवासारव

आमच्यात वैर कधीच नव्हते; सामनातून शिवसेनेची सारवासारव

Subscribe

'सामना' अग्रलेखात भाजप सरकारवर ताशेरे ओढणारी शिवसेना यावेळी सारवासारव करताना दिसत आहे. 'शिवसेना आणि भाजपमध्ये कधीच वैर नव्हते', असे शिवसेनेने आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सोमवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात युती संदर्भात महत्त्वाची बैठकत पार पडली. या बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली. परंतु, युती झाल्यापासून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळामध्ये शिवसेनेवर प्रचंड टीका होत आहे. उद्धव ठाकरे वेळोवेळी भाजपवर टीका करत आले. ‘भाजपसोबत आपण युती करणार नाही’, असे स्पष्ट मत त्यांनी सभांमध्ये मांडले होते. तरीदेखील त्यांनी अखेर भाजपसोबत युती केली. त्यामुळे सोशल मीडियावर शिवसेनेची खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून सारवासावर केली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेत कधीच वैर नव्हते, असे देखील म्हटले आहे.

‘महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला पूर्णविराम’

सामना अग्रलेखात शिवसेना म्हणते की, ‘महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला आहे. काही पोटावळ्यांना युती झाली तरी, ‘का झाली?’ असा मुरडा उठला होताच व होत नव्हती तेव्हा, “छे, छे, शिवसेना फारच ताणून धरते बुवा. हे काय सुरू आहे!’’ असले प्रश्न पडतच होते. असल्या पडेल प्रश्नांना उत्तरे देत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे. अमित शहा हे स्वतः ‘मातोश्री’वर आले. आम्हाला जे सांगायचे, बोलायचे ते ‘ठाकरे’ पद्धतीने ठोकून सांगितले. ज्या चुका आधी झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत यावर किमान एकमत झाले. त्यातून ‘युती’ला आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाला. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत तसे वैर नव्हते.’ यापुढे शिवसेनेने नितीश कुमार यांचेदेखील उदाहरण दिले आहे. शिवसेना म्हणते की, ‘विचार, भूमिका जुळत नसल्या, माणसांशी टोकाचे भांडण असले तरी राजकारणात पुन्हा एकत्र येण्यासाठी जे परवलीचे शब्द आहेत ते म्हणजे ‘राष्ट्रीय व्यापक हित’, ‘जनहित’ व ‘जनतेची इच्छा’. या इच्छेनुसार काँग्रेसची महाआघाडी बनू शकते, नितीश कुमार वगैरे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बसू शकतात, मग शिवसेना तर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बरोबरीची हिस्सेदारच आहे.’

- Advertisement -

‘शिवसेनेची तलवार म्यानबंद नाही’

शिवसेना अग्रलेखात म्हणते की, ‘आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.’

‘लाटेची उंची व तुफान कमी झाले आहे’

शिवसेना म्हणते की, २०१४ सालातली परिस्थिती वेगळी होती. लाटांचे उसळणे व कायमचे जिरणे देशात नवीन नाही. तसे नसते तर राजनारायणसारख्या विदूषकाने इंदिरा गांधींचा पराभव केला नसता. एका चिडीतून, संतापातून जनता भल्याभल्यांना पटकते व त्यांच्या विरोधात नव्यांना डोक्यावर घेते. २०१४ या वर्षात काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होताच. मोदी यांचा उदय व त्यांचे सादरीकरण लोकांना भिडले व एक लाट काँग्रेस, त्यांच्या बगलबच्च्यांविरोधात निर्माण झाली. मात्र आता त्या लाटेची उंची व तुफान कमी झाले आहे आणि २०१९ ची स्थिती ही लाटेवर निवडणुका लढण्याची नसून विचार, काम व भविष्य यावर लढण्याची आहे.

- Advertisement -

‘राहुल गांधींचे प्रगतीपुस्तक सुधारले’

शिवसेना म्हणते की, ‘राहुल गांधी यांचे प्रगतिपुस्तक 2014 च्या तुलनेत नक्कीच सुधारले आहे. मदतीला प्रियंका आलीच आहे, पण मोदी यांच्या नेतृत्वाशी त्यांची तुलना करता येणार नाही. तथापि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर नवे आव्हान उभे आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -