घरताज्या घडामोडीशिवसेनेला हवीय स्वबळावर सत्ता; टार्गेट १५०

शिवसेनेला हवीय स्वबळावर सत्ता; टार्गेट १५०

Subscribe

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपली आहे. सर्वपक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी, स्वबळाचा नारा दिला आहे. तर भाजपनेही मुंबईच्या महापौर पदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेनेही ‘हम भी कुछ कम नही’ या अंदाजात मुंबई महापालिकेवर पुन्हा स्वबळावर भगवा फडकविण्याचा दावा करीत १५० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. निमित्त होते, घाटकोपर ( पू.) येथे शनिवारी पार पडलेल्या ईशान्य मुंबई विभाग, शिवसेना आढावा बैठकीचे. यावेळी, उपस्थित शिवसेना नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी आदींना मार्गदर्शन करताना, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी मतभेद बाजूला ठेऊन पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्यास शिवसेना १५० जागा सहज जिंकेल आणि पुन्हा एकदा पालिकेवर भगवा फडकेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
त्यामुळे शिवसेनेने सत्तेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा गाठण्याचे म्हणजे जवळजवळ स्वबळावर सत्ता प्राप्तीचा नाराच दिला आहे.

यावेळी शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्र.८ च्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींच्या कामाचा आढावा पक्षश्रेष्ठीकडून घेण्यात आला. याप्रसंगी, विभागप्रमुख राजेंद्र राऊत आणि विभागसंघटक भारती बावदाने यांनी शिवसेना सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, संघटना बांधणीबाबत शाखानिहाय माहीती सेनेच्या वरीष्ठ नेत्यांना सादर केली. या बैठकीला रत्नागिरी संपर्कप्रमुख सुधिर मोरे, शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम पाटील, परमेश्वर कदम, विठ्ठल लोकरे, समीक्षा सक्रे, रुपाली आवळे, स्नेहल मोरे, अश्विनी हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

आता राज्यात सत्ता आपली आणि मुख्यमंत्रीही आपलेच असल्याने अधिक जोमाने विकासकामे करा आणि निवडणुकीत त्याच्या जोरावर मते मिळवा आणि शिवसेनेची सत्ता पुन्हा खेचून आणा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक आणि आमदार रवींद्र वायकर यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले. ईशान्य मुंबईतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “नगरसेवक, शाखाप्रमुख आपल्या दारी” हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत अधिकाधिक जनतेची कामे करा, असे ते म्हणाले.

- Advertisement -

आमदार सुनिल प्रभु यांनी, गटप्रमुख पुस्तिका आणि त्यात प्रत्येक बुथमधील दिलेली माहिती पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच, पुढील बैठकीत शाखानिहाय गटप्रमुखांना भेटून यांच्याशी सखोल चर्चा करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी, युवा आणि युवती पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मतदार नोंदणीवर युवा सैनिकांनी जास्त भर द्यावा जेणेकरुन येणाऱ्या निवडणुकांत पक्षाचा फायदा होईल, अशी सूचना केली. या महत्वपूर्ण बैठकीसाठी, उप विभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, बाबू दरेकर, सुनिल मोरे, हेमंत साळवी, विलास पवार, शाखाप्रमुख अजित गुजर, मयुरेश नामदास, शरद कोथेरे यांनी अथक मेहनत घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -