कल्याण-स्वारगेट मार्गावर शिवशाही बसला प्रवाशांची पसंती

कल्याण आगारातून आता आल्हाददायक प्रवास

Shivshahi bus started at Kalyan-Swargate route
कल्याण-स्वारगेट मार्गावर शिवशाही बस

प्रवाशांचे आल्हाददायक प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या एसटीच्या शिवशाहीला कल्याणकरांची चांगलीच पसंती मिळत आहे. कल्याण-नगर मार्गावर शिवशाही बसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याने आता कल्याण-स्वारगेट या मार्गावरील शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आल्हादायक झाला आहे.

राज्यात शिवशाही बसला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कल्याणहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर कल्याण एसटी आगारातून शिवशाही बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली होती. त्यामुळेच २२ डिसेंबरपासून एसटीच्या कल्याण आगारातून कल्याण स्वारगेट ही शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याण आगारातून सुटणाऱ्या या शिवशाही बसचा मार्ग कल्याण-डोंबिवली एम.आय.डी.सी स्थानक, लोढा हेवन, पनवेल, मेगा हायवे वाकड, चांदणी चौक वनाज, डेक्कन या मार्गे स्वारगेट असा असणार आहे.

कल्याणहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने शिवशाही बसला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. या वातानुकूलित बसचे दर आरक्षणासह ३१० रूपये असून कल्याण आगारातून जादा बसेसची सोय प्रवाशांकरता करण्यात आली आहे. शिवशाही वातानुकूलित बसचे भाडेही सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारे असल्याने प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण आगाराचे स्थानक प्रमुख तुकाराम साळुंखे यांनी केले आहे. कल्याण-नगर या मार्गांवर प्रवाशांचा मिळत असणारा प्रतिसाद चांगला असल्याने प्रशासनाकडून कल्याण-स्वारगेट या मार्गावर देखील शिवशाही बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून त्रस्त असलेल्या प्रवाशांना एसी मुळे दिलासा मिळणार आहे.

असे असणार बसेसचे वेळापत्रक

कल्याण स्थानकातून स्वारगेटकरता सुटण्याची वेळ सकाळी ७.००, ८.००, ९.००, ११.०० आणि दुपारी १२.००, १४.००, १५.००, १८.३०, १९.१५ अशी असणार आहे. तसेच स्वारगेट स्थानकातून सुटणाऱ्या बसची वेळ सकाळी ६.३०, ७.१५ दुपारी १३.००, १४.००, १५.००, १७.००, १८.३०, १९.३० आणि २१.०० अशी असणार आहे.

असा आहे मार्ग

कल्याण-डोंबिवली एम.आय.डी.सी स्थानक, लोढा हेवन, पनवेल, मेगा हायवे वाकड, चांदणी चौक वनाज, डेक्कन या मार्गे स्वारगेट