धक्कादायक: रुग्णाला दिला ‘मानव चलित’ व्हेंटिलेटर

रूग्ण शकील अहमद यांच्या नातेवाईकांनी वारंवार व्हेंटिलेटरची मागणी करुनही, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. 

सायन हॉस्पिटल (फाईल फोटो)

दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पालिका रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र, रुग्णालयावर असलेला जादाचा भार आणि त्या तुलनेत कमी असलेल्या सुविधा व मनुष्यबळ, यामुळे अनेकदा रुग्णालय प्रशासन रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी कमी पडतं. पालिकेच्या सायन रुग्णालयात बुधवारी असाच एक प्रकार घडला. शकील अहमद (४०) हे नेहमीप्रमाणे मानखुर्द परिसरात कामाला गेले होते पण त्यांना एका रिक्षावाल्याने अचानक धडक दिली. या अपघातानंतर त्यांना तात्काळ पालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यामुळे डॉक्टरांनी लगेचच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर शकील यांना कृत्रिम श्वसनासाठी व्हेंटिलेटर लावण्यात आला पण काही काळानंतर तो व्हेटिंलेटर बंद पडला. अहमद यांना तत्काळ व्हेंटिलेटरची गरज तर होती पण रुग्णालयातील सर्व व्हेंटिलेटर वापरात होते.

त्यामुळे अखेर अहमद यांना श्वसनासाठी एक अम्बू बॅग देण्यात आली. या बॅगमध्ये हवा भरण्यासाठी एक पंपही देण्यात आला. अहमदचे कुटुंबीय या पंपाच्या साहाय्यानं अम्बू बॅगमध्ये हवा भरत होते आणि त्याआधारे अहमद श्वासोच्छ्वास करत होते. शकील अहमद यांचे कुटुंबिय बराच वेळ बॅगमध्ये हवा भरण्याचं काम करत होते. अशाप्रकारे अहमद यांना हवा पुरवणं कदाचित त्यांच्या जीवावर बेतू शकलं असतं. शकील यांच्या नातेवाईकांनी वारंवार व्हेंटिलेटरची मागणी करुनही, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांना विचारलं असता “हे नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेऊन तिथल्या अधिष्ठातांशी बोलून याविषयी निर्णय घेऊ”, असं त्यांनी सांगितलं.

रुग्णालयाच्या एमआयसीयू विभागात बऱ्याच साथीचे आजार झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात फक्त ११ च व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. हे सर्व व्हेंटिलेटर वापरात असल्यामुळे सुरुवातीला अहमद यांना व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही. त्यांच्यासाठी कुठून व्हेंटिलेटर उपलब्ध करायचा हा प्रश्न आमच्यासमोरही होता. मात्र, काही काळानंतर त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आता त्यांची रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.– डॉ. जयश्री मोंडकर, सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता