करोनामुळे दादर, माहीम आणि धारावी परिसरात कोणती दुकानं कधी बंद राहणार? वाचा!

राज्य सरकारने दिलेल्या आदेशांनुसार मुंबईत आलटून-पालटून रोटेशननुसार रस्त्यांवरील दुकाने बंद राहणार आहेत. रस्त्यांनुसार त्यांची वर्गवारी असणार आहे. दादर आणि आसपासच्या परिसरातल्या रस्त्यांची यादी आणि त्यांचे बंद राहण्याचे वार जी-नॉर्थ वॉर्डच्या विभागीय आयुक्तांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

dadar market

करोनाचा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये धिम्या गतीने प्रसार होत आहे. मात्र, तो वाढू नये, यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. त्यामध्ये गर्दी होणाऱ्या बाजारपेठा रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून-पालटून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी विभागीय आयुक्तांना आपापल्या वॉर्डामधल्या अशा बाजारपेठांची यादी आणि त्या कधी बंद ठेवता येतील, याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांनुसार त्यावरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दादर, माहीम आणि धारावी या परिसरात कोणती दुकानं आणि कार्यालयं कधी बंद राहतील आणि कधी खुली राहतील, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बंद राहणारी दुकानं…

दादर
१) एन. सी. केळकर मार्ग (पूर्व)
२) डीसिल्वा रोड
३) छबिलदास रोड
४) एस. के. बोले मार्ग (दक्षिण)
५) सेनापती बापट मार्ग (कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटपासून हॉकर्स प्लाझापर्यंत)

माहीम
१) टी. एच. कटारिया रोड (दक्षिण – गंगा विहार हॉटेलपासून शोभा हॉटेलपर्यंत)
२) एल. जे. क्रॉस रोड (दर्गाह गल्ली)

धारावी
१) ९० फूट रोड (पश्चिम बाजू) आणि ६० फुटी रोड ते संत रोहिदास रोड
२) आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)
३) एम. जी. रोड (पश्चिम बाजू)

मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणारी दुकानं…

दादर
१) एन. सी. केळकर मार्ग (पश्चिम बाजू)
२) एम. सी. जवळे रोड भवानी शंकर म्युनिसिपल शाळेपर्यंत
३) एम. जी. रानडे रोड
४) एस. के. बोले मार्ग (उत्तर बाजू)

माहीम
१) टी. एच. कटारिया रोड (उत्तर बाजू) (गंगा विहार हॉटेल ते शोभा हॉटेलपर्यंत)
२) एल. जे. क्रॉस रोड (दर्गाह गल्ली)

धारावी
१) ९० फूट रोड (पूर्व बाजू) आणि ६० फुटी रोड ते संत रोहिदास रोड
२) आंध्र व्हॅली रोड (पूर्व बाजू)
३) एम. जी. रोड (पूर्व बाजू)

dadar shop close notification

dadar shop close notification

दरम्यान, या दुकान बंद ठेवण्याच्या निर्णयामधून मेडिकल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आलं आहे. जी-नॉर्थ विभागाचे विभागीय आयुक्त किरण दिघावकर यांनी हे निर्देश दिले आहेत. बुधवार १८ मार्च २०२०पासूनच हे आदेश लागू झाले आहेत. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं देखील विभागीय आयुक्तांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.


वाचा सविस्तर – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!