प्लाझ्मा दानाला मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद

प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढवण्याचे आवाहन पालिका रुग्णालयांसमोर निर्माण झाले आहे.

plasma therapy

कोरोनावर प्रभावी पर्याय म्हणून प्लाझ्मा उपचार पद्धतीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, प्लाझ्मा दानासाठी पालिकेकडून आवाहन करूनही अद्यापर्यंत ७०० ते ७५० जणांनीच प्लाझ्मा दान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढवण्याचे आवाहन पालिका रुग्णालयांसमोर निर्माण झाले आहे.

मुंबई भागातील १ लाख ८३ हजार ४२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र मुंबईमधील अवघ्या ७०० जणांनीच अद्यापर्यंत प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा दानासाठी पालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असली तरी लोकांचे त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्लाझ्मा उपचार पद्धतीही कोरोना रुग्णांसाठी वरदान असली तरी तिचा फायदा रुग्णांना होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पालिका प्रमुख रुग्णालयांमधून प्लाझ्मा संकलित करण्यात येत असला तरीही दानासाठी अल्प प्रतिसाद मिळत आहे. सेवाभावी संस्था तसेच लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दानासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे जवळपास ३५० दात्यांनी प्लाझ्मा दान केले होते.

नायर, सायन व केईएम असे तीन रुग्णालयांमध्ये ७०० जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. कोरोनानंतर उद्भवणार्‍या समस्यांमुळे इच्छूक दान करण्यास येत नसावेत, मात्र समुपदेशन सुरु आहे.
-डॉ. रमेश भारमल, संचालक, प्रमुख पालिका रुग्णालये.

प्लाझ्मा दानाची सद्यपरिस्थिती

  • नायर रुग्णालय – २६० दाता
  • केईएम रुग्णालय – ३५० दाता
  • सायन रुग्णालय – १०० दाता