घरCORONA UPDATEकेईएममध्ये ग्लोव्हज, सिरींजचा तुटवडा; ग्लोव्हजच्या पुनर्वापरामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता

केईएममध्ये ग्लोव्हज, सिरींजचा तुटवडा; ग्लोव्हजच्या पुनर्वापरामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता

Subscribe

कोरोनासारख्या महामारीमध्ये रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी स्वत:च्या जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत आहेत. मात्र मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ग्लोव्हज आणि इंजेक्शनच्या सिरीनजचा तुटवडा असल्याने डॉक्टर, परिचारिकांना एकच ग्लोव्हज धुवून वापरावे लागत आहेत. तसेच काही वेळेस अन्य वॉर्ड किंवा विभागातील डॉक्टर किंवा परिचारिकांकडून घेऊन काम करावे लागत आहेत. एकीकडे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी कोविड रुग्णांची सेवा करत असताना त्यांना आवश्यक वस्तू पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांबरोबरच कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होऊ नये यासाठी डॉक्टर व अन्य कर्मचार्‍यांना स्वत:सह रुग्णांची काळजी घ्यावी लागत आहे. त्यासाठी त्यांना पीपीई किट, एन 95 मास्क, सर्जिकल मास्क, हॅण्ड ग्लोव्हज यासारख्या बाबी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी सिरीनज आवश्यकता असते. मागील अनेक दिवसांपासून केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांना पुरेसे हॅण्डग्लोव्हजच मिळत नाहीत. रुग्णालयात असलेल्या हॅण्डग्लोव्हजच्या तुटवड्यामुळे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर एकाच हॅण्डग्लोव्हजचा वापर करत आहेत. अत्यावश्यक विभाग व वॉर्डमध्ये एका रुग्णाच्या रक्ताने माखलेला हॅण्डग्लोव्हज घालूनच दुसर्‍या रुग्णाला डॉक्टर तपासताना दिसत आहेत. तर काही डॉक्टर रुग्णाला तपासल्यानंतर हॅण्डग्लोव्हज पाण्याने धुत आहेत.

- Advertisement -

ग्लोव्हज तुटवड्यामुळे एकाच ग्लोव्हजचा वापर डॉक्टरांकडून करण्यात येत असल्याने कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. हॅण्डग्लोव्हजच्या तुटवड्यामुळे अनेक डॉक्टर व कर्मचारी मेडिकल स्टोरमधून ग्लोव्हज विकत घेत आहेत. तसेच ज्या विभागामध्ये अतिरिक्त ग्लोव्हज आहेत, अशा विभागातून ग्लोव्हज मागवण्याची वेळ कर्मचार्‍यांवर येत आहे. मात्र मुळातच तुटवडा असल्याने विभागा-विभागातून एकमेकांना ग्लोव्हज देण्याचे प्रमाणही कमी आहे. हॅण्डग्लोव्हजप्रमाणे रुग्णालयामध्ये एन95 मास्क आणि रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरीनजचाही तुटवडा जाणवत आहे. सिरीनजचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकल स्टोरमधून सिरीनज विकत आणण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना सिरीनजच्या नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. यासंदर्भात रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचार्‍यांकडून रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

धान्यांच्या पाकिटांऐवजी ग्लोव्हज द्या

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोना योद्धे म्हणून गौरवण्यात येत असलेल्या आरोग्य सेवकांना विविध राजकीय पक्षांकडून अधूनमधून धान्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये पालिकेकडून आम्हाला पूर्ण वेतन येत असल्याने आम्हाला धान्यांच्या पाकिटांची आवश्यकता नसून, रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे साहित्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे धान्याची पाकिटे देण्याऐवजी ग्लोव्हज, मास्क, सिरीनज देण्यात याव्यात अशी मागणी केईएम रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -