राज्यातील मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संभ्रमाला अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे पूर्णविराम दिला. या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून जो निर्णय होईल, तो शिवसेनेसाठी मान्य असेल.” या विधानाने राजकीय वर्तुळातील चर्चांना दिशा मिळाली.
याच पार्श्वभूमीवर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वडील आणि काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. “तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा,” असे लिहीत त्यांनी वडिलांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार याबाबत गोंधळाची स्थिती होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. या दोन्ही गटांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव असल्याचे दिसत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, “मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा जो निर्णय असेल, त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल,” असे सांगून या चर्चांवर पडदा टाकला.
राजकीय घडामोडींमध्ये शिंदे कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. या कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे यांची भूमिका किती संयमी आहे, हे पाहून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक मुलगा म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : भाजप नेतृत्त्व धक्कातंत्राच्या तयारीत! शहा अन् तावडेंमध्ये बैठक, ‘CM’ फडणवीसच की…
“तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा. आपल्या पक्षाचा, आपल्या कार्यकर्त्यांचा, आणि महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान कसा राखायचा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. तुमची ही भूमिकाही तुमच्या साधेपणाचे आणि मोठेपणाचे प्रतीक आहे,” असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
या पोस्टमुळे श्रीकांत शिंदे यांनी वडिलांप्रती असलेल्या आपल्या निस्सीम आदराची आणि प्रेमाची जाणीव पुन्हा एकदा करून दिली.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, “राज्यातील जनतेने शिवसेना आणि भाजप महायुतीला जो कौल दिला आहे, तो एक जबाबदारी आहे. आजही मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि पुढेही कार्यकर्त्याच्याच भूमिकेत राहीन.” त्यांच्या या वक्तव्यातून ते जनतेच्या मनातील विश्वास जपण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोप्या आणि सरळ धोरणाने कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांना एक सकारात्मक संदेश गेला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या भूमिकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांची भावनिक पोस्ट ही जनतेशी नाते जोडण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून व्यक्त झालेली भावना आहे, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा : “फडणवीसांनी खूप अवहेलना सहन केली, पण…”, ‘CM’पदाच्या चर्चेवर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं