घरमुंबईमृत पेशंटच्या नातेवाईकांचा हॉस्पीटलला घेराव

मृत पेशंटच्या नातेवाईकांचा हॉस्पीटलला घेराव

Subscribe

येथील सत्यसाई प्लॅटिनम या खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. हा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाला घेराव घातल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

उल्हासनगर 3 येथील 22 सेक्शन परिसरात राहणार्‍या सीमा राजू गोकलानी (52) यांना 11 सप्टेंबर 2019 रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सीमा यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर उल्हासनगरच्या सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे गेल्या 9 दिवसांपासून उपचार घेणार्‍या सीमा गोकलानी यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सीमा गोकलानी यांच्या उपचाराचा खर्च शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर झाला असल्याचे सांगितले. मात्र अचानक मृताच्या नातेवाईकांच्या हाती 85 हजार रुपयांचे बिल थोपविण्यात आले. जोपर्यंत बिल देणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात देणार असे, हॉस्पिटल प्रशासनाकडून धमकी दिल्याचा आरोप गोकलानी यांच्या नातेवाईकांनी केला. यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि गोकलानी यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाला घेराव घातला. यावेळी मनसे नेते मनोज शेलार, टी ओ केचे नेते ओमी कलानी, भाजप नेते कुमार आयलानी यांनी मध्यस्थी करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोकलानी यांच्या नातेवाईकांकडून 40 हजार रुपये घेतले गेले व सीमा गोकलानी यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला गेला.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 6 तासांच्या आत रुग्णालयात दाखल केल्यानंतरच शासकीय योजनेचा खर्च मंजूर होतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला बायपास सर्जरीसाठी 8 दिवस परीक्षणासाठी ठेवावे लागते. त्यानंतरच बायपास सर्जरी केली जाते. त्यामुळे आम्ही उपचार सुरू ठेवले. दुर्दैवाने सीमा गोकलानी यांचा मृत्यू झाला. आम्ही महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अटी व शर्थी मृताच्या नातेवाईकांना सांगितल्या होत्या त्या मंजूर झाल्या तरच हा खर्च शासनाकडून मंजूर होईल असे सांगितले होते. पैशासाठी मृतदेह ताब्यात न देण्याचा आरोप देखील चुकीचा आहे. उलट आम्ही उपचारासाठी झालेल्या 85 हजार रुपये खर्चापैकी 45 हजार रुपये माफ केले आहेत.
– कुणाल गावडे, प्रशासकीय अधिकारी, सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -