भिवंडीत प्राथमिक शाळेत कोसळले छत; जिवीत हानी नाही

भिवंडी तालुक्यातील दुगाड येथे शनिवारी रात्री प्राथमिक शाळेचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी घडलेली नाही.

slab collapse in bhiwandi school
भिवंडीत दुगाडच्या प्राथमिक शाळेत कोसळले छत

भिवंडी तालुक्यातील दुगाड येथे शनिवारी रात्री प्राथमिक शाळेचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र, ही दुर्घटना शनिवारी रात्री घडल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली आहे. भिवंडीतील दुगाड या गावात ही ४ थी पर्यंत शाळा असून या शाळेत १०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला चार वर्ग असून यातील पहिलीच्या वर्गाचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. तर अन्य तीन वर्गांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे ते देखील कधीही कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

२५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते बांधकाम

दुगाडच्या प्राथमिक शाळेचे बांधकाम मागील २५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. सिमेंट विटांचे बांधकाम असलेल्या इमारतीवर लाकडी वासे, खांब, कवले टाकण्यात आलेली आहेत. लाकडी वासे सडल्याने छत कमकुवत झाले होते. त्यामुळे छत कधीही कोसळण्याची भीती होती. त्यातच सध्या पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे पाऊस आणि वारा याचा दाब सोसू न शकल्याने शाळेचे छत कोसळून दुर्घटना घडली आहे. ऐन पावसाळ्यात शाळेचे छत कोसळून दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांना खाजगी घराचा आसरा घ्यावा लागला आहे.

मौजे दुगाड येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असून या शाळेची दुरुस्ती देखील करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या दुरुस्तीस विरोध केल्याने शाळेची दुरुस्ती होऊ शकली नाही आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे.  – अनंता शेलार, माजी सरपंच; दुगाड – ग्राम पंचायत


हेही वाचा – मालाड जलाशयाला भेगा पडल्याची भीती व्यक्त

हेही वाचा – मालाड दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन माहुलमध्ये, पालिका देणार १०० सदनिका!