घरमुंबईमुलाला सुखरुप सोडलं.. पण 'त्या' मात्र अडकल्या

मुलाला सुखरुप सोडलं.. पण ‘त्या’ मात्र अडकल्या

Subscribe

अंधेरीच्या गोखले पुलावरुन 'त्या' रोजच्याप्रमाणे घरी येत होत्या. मात्र, केवळ दुर्देव म्हणून आज पुलासकट त्यासुद्धा खाली कोसळल्या आणि जखमी झाल्या.

मुंबईकरांसाठी आजची सकाळ झाली ती एका मोठ्या दुर्घटनेने. सोमवारी रात्री उशिरापासूनच मुंबईत पाऊस कोसळतोय. त्याचा फटका रेल्वे मार्गांना तर बसलाच पण रस्त्यावरुन चालणार्या पादचाऱ्यांनाही आज पावसाचा खूप मोठा फटका बसला. अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा काही भाग पावसामुळे कोसळला आणि पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प झाली. सकाळी ७.३० वाजता झालेल्या दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकीच एक आहेत अस्मिता काटकर. अस्मिता काटकर यांच्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने दुर्देवी होता असंच म्हणावं लागेल. रोजच्या दिनचर्येप्रमाणे अस्मिता आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या खऱ्या मात्र, तिथून परतत असताना त्या गोखले पूल दुर्घेटनेच्या शिकार बनल्या. या दुर्घटनेत अस्मिता गंभीर जखमी झाल्या. या संपूर्ण घटनेचा थरार अस्मिता यांच्या नातेवाईकांनी माय महानगरशी बोलताना सांगितला.

केवळ दुर्देव…

अस्मिता काटकर या ३५ वर्षीय महिला नेहमीप्रमाणे मुलाला शाळेत सोडायला गेल्या होत्या. अंधेरी पूर्वेला असलेल्या परांजपे शाळेत त्यांनी आपल्या मुलाला सोडलं आणि गोखले पूलावरुन पुन्हा घराच्या दिशेने निघाल्या. मात्र त्यांचं दुर्देव म्हणजे ध्यानीमनी नसाताना अचानक या पुलाचा काही भाग कोसळला आणि अस्मिता पुलावरच असल्यामुळे त्याही पुलासोबत कोसळल्या. या घटनेत डोक्याला आणि हाताला जबर मार बसल्यामुळे अस्मिता गंभीर जखमी झाल्या. अस्मिता काटकर या दररोज गोखले पुलावरुनच ये-जा करत असत. गोखले पूल हा त्यांच्यासाठी सोयीचा रस्ता होता. मात्र, आजचा दिवस हा त्यांच्यासाठी वाईट होता असंच म्हणावं लागेल.

- Advertisement -

“आम्हाला न्यूज पाहिल्यानंतर कळलं की अस्मिता या देखील या दुर्घटनेत अडकल्या आहेत. नेहमी प्रमाणे त्या मुलाला शाळेत सोडायला गेल्या होत्या. तो ब्रीज कोसळला तेव्हा त्या तिथेच होत्या. त्यांच्या डोक्याला आणि हाताला लागलं आहे. त्यांना खूप मार लागला आहे.”  – रेश्मा चौकेकर, अस्मिता यांचे नातेवाईक

”अस्मिता काटकर यांच्या मेंदुतून खूप रक्तस्त्राव झाला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणताच त्वरित आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेलो. अस्मिता यांचं ऑपरेशन अजून सुरु आहे.  न्यूरोलॉजीस्ट, प्लास्टिक सर्जन आणि ऑरथोसर्जनची एक टीम हे ऑपरेशन करत आहे. 
– डॉ. राजेश सुखदेव , वैद्यकीय अधीक्षक, कूपर रुग्णालय

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -