घरमुंबईमिठातून साकारतो सामाजिक गोडी

मिठातून साकारतो सामाजिक गोडी

Subscribe

आरोग्य विभागातील शिपाई शिवाजी चौगुलेकडून संदेश

एखाद्या पदार्थामध्ये मीठ कमी झाले तर त्याची चव बिघडते. त्यामुळे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी मिठाचे प्रमाण आवश्यक असते. ज्याप्रमाणे कोणत्याही पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही, त्याचप्रमाणे मिठाचा वापर करून सामाजिक गोडी निर्माण करण्याचे काम आरोग्य विभागातील शिपाई शिवाजी चौगुले करत आहे. मिठाचा वापर करून शिवाजी सुबक आणि आकर्षक रांगोळ्या काढत आहे. यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या, डॉट्स क्षयरोग, नेत्रदान हेच श्रेष्ठदान, अवयवदान, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा असा सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणार्‍या रांगोळ्या त्यांनी काढल्या आहेत. नुकताच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 50 किलो जाडे मीठ वापरून आरोग्य विभागाचा साकारलेला लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला समाजासाठी वेळ देणे अशक्य असते. आपल्याकडील कलेच्या माध्यामातून ही उणीव भरून काढत कलेचा फक्त क्षणिक आनंदासाठी नव्हे तर सामाजिक जाणीवेसाठी शिवाजीने वापर केला आहे. रांगोळी प्रत्येकजण काढतो, परंतु त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न फार कमी जण करतात. त्यातच विविध रंगांचा वापर करून काढण्यात आलेली रांगोळी लवकरच पुसली जाते. त्यामुळे आपण दिलेला संदेश हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी शिवाजीने वेगळा विचार करण्यास सुरुवात केली. तो कामाला असलेला आरोग्य विभाग आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मिठाचा आरोग्याशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे मिठाला केंद्रस्थानी ठेऊन लोकांना आरोग्याचा संदेश देण्याचा निर्णय घेत शिवाजीने विविध रांगोळ्या काढल्या आहेत.

- Advertisement -

शाळेपासूनच शिवाजीला चित्र काढण्याची आवड होती. परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला आपली कला जोपासता आली नाही. पण त्याने आपल्यातील कला जिवंत ठेवली. कोल्हापूरहून मुंबईत मामाकडे राहण्यासाठी आलेल्या शिवाजीने मामासोबत केशकर्तनालयाचा व्यवसाय सुरू केला. मामाला मदत करण्याबरोबरच शिवाजी मुंबईतील अनेक कलादालनाला भेटी देऊ लागला. यातूनच त्याची कला वाढीस लागली. शिवाजी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये शिपाई म्हणून कामाला लागला. आरोग्य विभागात त्याला मिळालेली नोकरी ही त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आरोग्य विभागातील वार्ताफलकावर सुविचार आणि आरोग्यविषयक घोषवाक्य लिहिण्यास त्याने सुरुवात केली. अशा तर्‍हेची घोषवाक्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत असे. त्यातूनच त्याने कार्यालयामध्ये विविध सण, कार्यक्रमाच्या वेळी रांगोळी काढण्यास सुरुवात केली. रांगोळी काढताना त्यांनी अन्य पर्यायांचा वापर करण्यास सुरुवात केली. यातूनच त्याला मिठाचा वापर करून रांगोळी काढण्याची कला सुचली. त्यानुसार त्याने आतापर्यंत मिठापासून अनेक रांगोळ्या काढल्या.

शिवाजीने आतापर्यंत मिठापासून स्त्रीभ्रूण हत्येविरोधात ‘लेक वाचवा’ हा संदेश देणारी 45 किलो मिठापासून रांगोळी साकारली आहे. माघी गणेश जयंतीला 30 किलो मिठापासून श्री गणेशाचे रुप, स्वातंत्र्यदिनानिमित्त 50 किलो मिठापासून ‘डॉट्स क्षयरोग’ कार्यक्रमांतर्गत ‘पूर्ण कोर्स, पक्का इलाज’ हा संदेश दिला. शिवजयंतीला ‘जाणता राजा’ साकारला, नुकत्याच झालेल्या दिवाळीमध्ये त्याने 50 किलो मीठ आणि पाच किलो रंगाचा वापर करून ‘संकल्प आरोग्य महाराष्ट्राचा’ हा संदेश देणारी रांगोळी साकारली आहे. शिवाजीने साकारलेल्या रांगोळीची दखल घेऊन आरोग्य विभागाने त्याचा सत्कारही केला आहे. पण अद्याप राज्य सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाकडून त्याची दखल घेतली नसल्याची खंत शिवाजीने व्यक्त केली.

- Advertisement -

इतरांपेक्षा काहीतरी वेगळे साधन वापरून मी आतापर्यंत अनेक रांगोळ्या रेखाटल्या आहेत. 10 ते 12 तास एका जागी बसून रांगोळी काढणे, एकाग्रता ठेवणे, यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आरोग्य विभागाने माझा वेळोवेळी सन्मान केला. पण महाराष्ट्र सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाने अद्यापपर्यंत माझ्या कलेची दखल घेण्यात आलेली नाही.
– शिवाजी चौगुले, शिपाई, आरोग्य विभाग

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -