समाजसेवक मोहन धारिया

मोहन धारिया यांचा आज स्मृतिदिन. मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडील मूळचे गुजरातचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते. मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील म्हणून काम करून लागले.

मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘लोकसेना’ नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात ‘नॅशनल लेबर सेंटर’ ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते. सन १९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगार निर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन धारियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

खासदार असताना मोहन धारिया यांनी १९७० मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. राजीव गांधी आणि चंद्रशेखर या पंतप्रधानांच्या आग्रहाखातर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले. मोहन धारिया यांनी १९८३ च्या सुमारास ‘वनराई’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटींपेक्षा जास्त रोपांचे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते.

भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख ‘वनराई बंधारे’ बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते. अशा या महान समाजसेवकाचे 14 ऑक्टोबर 2013 रोजी निधन झाले.