Eco friendly bappa Competition
घर मुंबई काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील; जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत संजय राऊत पहिल्यांदाच बोलले

काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील; जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत संजय राऊत पहिल्यांदाच बोलले

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू असून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. परंतु विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar), ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (pruthviraj chavan) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सुद्धा जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना महाविकास आघाडीचा 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि कोणत्याही फॉर्म्युलावर कुठलीही चर्चा झालेली नाही. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत निर्णय घेऊ. याशिवाय मागच्या लोकसभेत म्हणजेच आताच्या लोकसभेत आमच्या पक्षाच्या 19 जागा आहेत. महाराष्ट्रात जागा वाटप करताना तीन पक्षात समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, ते बरोबर आहे. त्यामुळे जागा वाटप करताना काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य असले तरी काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आम्ही काँग्रेसचा मोठा भाऊ झालो – अजित पवार
अजित पवार कोल्हापूरमध्ये म्हणाले होते की, महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं काम आपल्याला करायचे आहे. आपली जास्त ताकद असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये महत्त्व दिले जाईल. यापूर्वी काँग्रेसला जागा मिळायच्या आणि आम्हाला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची. मात्र, आता आम्ही काँग्रेसचा मोठा भाऊ झालो आहोत, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या 44 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 जागा असल्याचे गणित मांडले.

शिवसेना उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष – पृथ्वीराज चव्हाण
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिला की, आपल्या पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक वक्तव्य करत असतात. सद्यस्थिती पाहता आजच्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विधान करण्यात काही चुकीचे नाही. पण अशा वक्तव्यांना फारसं महत्त्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांना लगावला.

- Advertisement -

जागावाटप मेरीटनुसार होईल – नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीतील जागावाटप मेरीटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल. प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना त्यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली. महापुरुषांचा अपमान संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

 

- Advertisment -