९ वर्षांनी पकडला गेला खुनी मुलगा, सावत्र आईची हत्या करून झाला होता फरार

murder

सावत्र आईची हत्या करून मागील ९ वर्षांपासून ठाणे जिल्हयातील भिवंडीत राहणाऱ्या मुलाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ठाण्यातील जांभळी नाका येथून अटक केली आहे. पुढील तपासासाठी त्याचा ताबा पश्चिम बंगाल पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

सलीम लुतफर मोल्ला (३२) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सलीम हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील परगणा येथे राहणारा आहे. सावत्र आई सतत आपल्या सख्ख्या आईला त्रास देते असल्याच्या करणावरून सलीम याने २०११ मध्ये सावत्र आईची हत्या केली होती. त्यानंतर तो आपल्या सख्ख्या आईला आणि पत्नीला घेऊन कोलकत्ता येथे फरार झाला होता. त्यानंतर ओळखीने भिवंडीत आला, भिवंडीत शिंपीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी पश्चिम बंगाल येथून फरार असलेला खुनातील आरोपी गुरुवारी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सलीम मोल्ला याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून याबाबत पश्चिम बंगाल पोलिसांना कळवण्यात आले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.