कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन पूर्ववत

कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

sonography machine is restored in cama hospital
कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन पूर्ववत

कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद पडल्यामुळे सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आल्यानंतर कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन पूर्ववत करण्यात आली आहे. कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद असल्याने येथे येणाऱ्या अनेक गर्भवती महिलांना त्रास सहन करून सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत होते. तसेच सोनोग्राफी सुविधा बंद ठेवण्यात आल्याने महिला रुग्ण अक्षरश: मेटाकुटीला आल्या होत्या. मात्र, आता ही मशीन पूर्ववत केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे गर्भवती महिलांची गैरसोय होत होती. पण मुख्यतः त्या सोनोग्राफी मशीनवर प्रसुतीपूर्व चाचण्या वगळता इतर तपासणी सुरळीत चालू होत्या आणि गर्भवती महिलांना देखील अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिनीतून सेंट.जॉर्जे रुग्णलयात प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी पाठवले जात होते.  – डॉ. पल्लवी सापळे; अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे कळताच नवीन मशीन मागविण्यासाठी दिल्लीतील कंपनीशी तात्काळ संपर्क साधून नवीन मशीन मागवून घेण्यात आली. पण ही नवीन मशीन कार्यान्वित होण्यासाठी प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणीविषयी (पिसिपिएनडीटी कायदा) असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून तसे प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते. ते मिळवण्यासाठी जे.जे. प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आज कामा रुग्णालयात नवीन मशीन स्थापित करून कार्यान्वित केली आहे.

हाफकिन केंद्रातून नवीन मशीनच्या खरेदी संदर्भात तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधून पिसिपिएनडीटीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यात सचिव, डॉ. संजय मुखर्जी यांची मदत मिळाली असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.


हेही वाचा – ठाणे जिल्ह्यातील ‘बाल लिंग’ गुणोत्तरात वाढ!