कोकण मंडळ सदनिकांसाठी विशेष मोहीम

mhada sankraman shibir
म्हाडा

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आवश्यक पुरावे तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी २८जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दररोज ५०० यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. सोडतीतील संकेत क्रमांक २७४ विरार बोळींज (अल्प उत्पन्न गट) व संकेत क्रमांक २७६ बाळकूम ठाणे (मध्यम उत्पन्न गट) या योजनेतील सर्व यशस्वी अर्जदार तसेच टप्पा क्रमांक १ मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ज्या यशस्वी अर्जदारांना सहभाग घेता आला नाही,अशा अर्जदारांनी पात्रता निश्चित करण्यासाठी या विशेष मोहिमेत सहभागी होऊन आवश्यक कागदपत्रे / पुरावे सादर करावीत, असे आवाहन कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी केले आहे.

या विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयातील मित्र कक्षातून टोकन दिले जाणार आहे. या टोकन क्रमांकाबरोबर अर्जदारास आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट दिली जाणार आहे. टोकन मिळवण्यासाठी अर्जदाराने सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जाची प्रत व स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे. पात्रतेसाठी आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट म्हाडाचे संकेतस्थळ https://mhada.gov.in वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.