घरताज्या घडामोडीआम आदमी पार्टीत फूट; 'मराठी' नेत्यांची गळचेपी; मुंबई अध्यक्ष प्रिती मेनन यांना...

आम आदमी पार्टीत फूट; ‘मराठी’ नेत्यांची गळचेपी; मुंबई अध्यक्ष प्रिती मेनन यांना हटविण्याची मागणी

Subscribe

मुंबई : दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र व मुंबई कमिटीमध्ये पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रिती मेनन यांच्याकडून ‘मराठी’ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदिना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत, आर्थिक व्यवहारात डावळणे, जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देणे, धमकी देणे, चकाला येथील कार्यालयात बोलावून दोन तास कोंडून ठेवणे, मोबाईल जप्त करणे व नोटीस न देता पक्षामधून बडतर्फ करण्याची कारवाई करीत हुकूमशाही गाजविणे आदी गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर – देशमुख, संजय बापेरकर, ऍड. राकेश राठोड आदी मराठी नेते, पदाधिकारी यांनी जाहीर मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. (Split in Aam Aadmi Party Marathi leaders Demand for removal of Mumbai president Priti Menon)

तसेच, आम आदमी पार्टीमध्ये शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला साधे एक फुल, पुष्पहारही अर्पण न केल्याचे निदर्शनास आणले तरी अध्यक्षा प्रिती मेनन यांनी त्याची गंभीरपणे दखल घेऊन कृती करणे अपेक्षित असताना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले, असा आरोपही बापेरकर, भुतेकर व राकेश राठोड यांनी यावेळी केला.

- Advertisement -

आपचे मुख्यमंत्री व राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री यांच्या मुंबई दौऱ्याप्रसंगी काही गंभीर चुका झाल्या. त्यानंतर प्रिती मेनन यांनी, तुम्ही माझ्याविरोधात काही षडयंत्र रचत आहात, असे गंभीर आरोप करून आमचे खच्चीकरण केले, आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. मात्र आम्ही काही मराठी नेते, पदाधिकारी म्हणून एखादा विषय व मुद्दा उपस्थित केल्याने आम आदमी पार्टीमधून आमच्यासह तब्बल अडीचशे मराठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींना नियमबाह्य पद्धतीने बडतर्फ करण्यात आले, असा आरोपही बापेरकर, भुतेकर व राठोड यांनी यावेळी केला.

मराठी नेते, पदाधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याने मुंबई अध्यक्षा प्रिती मेनन यांच्या विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दिल्लीतील आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल व अन्य पक्ष श्रेष्ठींनी प्रिती मेनन यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे व पोलिसांनी त्यांच्या विरोधात एट्रोसिटीची कारवाई करावी, अशी मागणीही या मराठी नेत्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, आम आदमी पार्टीची घटना अभ्यासल्यास मुंबई अध्यक्ष पदी विराजमान प्रिती मेनन यांची नेमणूक घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याचा दावाही यावेळी ऍड राकेश राठोड यांनी केला. पक्षाच्या घटनेनुसार, एक पदाधिकारी एकाच वेळी केंद्रीय व राज्य कार्यकारिणी कमिटीवर दोन पदे भूषवू शकत नाही. असे असताना प्रिती मेनन या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीवर महत्वाच्या पदावर कसे काय काम करू शकतात, असा सवाल करीत ऍड राकेश राठोड यांनी प्रिती मेनन यांना मुंबई अध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी केली.

या गंभीर प्रकरणी आम्ही पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार दाखल केली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मुंबई व महाराष्ट्रात हुकुमशाही गाजविणाऱ्या प्रिती मेनन व त्यांना साथ देणारे मनू पिल्लई यांना पदावरून हटविले नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देणार आहोत, असा इशाराही ऍड. राकेश , संजय बापेरकर व रमेश भुतेकर – देशमुख यांनी दिला आहे. मात्र आम्ही आम आदमी पार्टी न सोडता मुंबई व महाराष्ट्रसाठी प्रामाणिकपणे यापूर्वी जसे काम केले तसेच काम करीत राहणार असल्याचा दावा ऍड. राठोड, भुतेकर व बापेरकर यांनी केला आहे.

यावेळी, आम आदमी पार्टीमधील राजेश सामंत व सोशल मिडिया सांभाळणारे पदाधिकारी यांनीही आपच्या मुंबई अध्यक्षा प्रिती मेनन या हुकुमशाही पद्धतीने व मनमानी पद्धतीने मराठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करीत असल्याचा आरोप केला. या आरोपांबाबत आमच्या प्रतिनिधींनी, आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रिती मेनन यांना संपर्क करण्याचा व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद लाभला नाही.


हेही वाचा – भारतातील राजदूतासह इस्रायल दूतावासातील अधिकारी संपावर, वाचा नेमके प्रकरण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -