घरक्रीडाक्रीडा पत्रकार शिवराम सोनवडेकर यांचे निधन

क्रीडा पत्रकार शिवराम सोनवडेकर यांचे निधन

Subscribe

कबड्डी, खो-खो आणि कुस्तीसारख्या देशी खेळांना वर्तमानपत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे क्रीडा पत्रकार, क्रीडा संघटक, खो-खो आणि कबड्डी प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

सोनवडेकर यांनी आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत खेळाडू, संघटक, प्रशिक्षक आणि पत्रकार म्हणून देशी खेळांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. क्रीडा पत्रकार होण्यापूर्वी ते एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जायचे. लालबाग-परळमध्ये त्यांचे बालपण गेल्यामुळे कबड्डी, खो-खो तसेच धावणे या खेळांमध्ये त्यांना लहानपणापासूनच रस होता. एक धावपटू म्हणून त्यांनी रुपारेल महाविद्यालयातील आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ते बर्‍याच आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले. तसेच ते परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राकडून कबड्डी आणि खो-खोसुद्धा खेळायचे. ते वीर बजरंग संघाकडूनही कबड्डी खेळले.

- Advertisement -

सोनवडेकर यांचे शिक्षण दादर विद्यामंदिरामध्ये झाले, पण त्यांची खो-खो आणि कबड्डीपटू म्हणून कारकीर्द बहरली ती रूपारेल महाविद्यालयात. त्यांच्या चांगल्या खेळामुळे रूपारेलने आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये खो-खोमध्ये अनेक जेतेपदे पटकावली. ते चांगले कबड्डीपटू म्हणूनही ओळखले जायचे.

महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी खो-खोच्या संघटनेचा कारभारही सांभाळला. ते ७० च्या दशकात मुंबई खो-खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांच्या कार्यकाळात मुंबई शहर संघाने खो-खोतही आपला दबदबा राखला होता. यानंतर त्यांनी रूपारेलच्या महिला खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुपारेलने आंतर महाविद्यालयीन स्पर्धा जिंकल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ५०० हुन अधिक राज्य आणि राष्ट्रीय दर्जाचे खो-खो व कबड्डीपटू घडले. त्यांची शिष्या वीणा परब हिला अर्जुन पुरस्कारही मिळाला. त्यांच्या या योगदानाबद्दल महाराष्ट्र खो-खो संघटनेने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -