घरताज्या घडामोडीपोलिसांच्या नाकाबंदीमुळे एसटी व बेस्टचे वेळापत्रक कोलमडले 

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे एसटी व बेस्टचे वेळापत्रक कोलमडले 

Subscribe

पोलिसांकडून सोमवारी शहरातील विविध महामार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे नाकांबदीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका एसटी आणि बेस्टच्या प्रवाशांना बसलेला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी शहरातील विविध महामार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे नाकांबदीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका एसटी आणि बेस्टच्या प्रवाशांना बसलेला आहे. बसेस रस्त्यावर अडकून राहिल्याने एसटी आणि बेस्टच्या आगारात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. तसेच पोलिसांच्या या नाकाबंदीमुळे एसटी व बेस्टचे वेळापत्रक कोलमडले आहे.

नाकाबंदीचा सामान्य मुंबईकरांना झाला मनस्ताप

- Advertisement -

‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य शासनाने काही नियमांचे शिथिलीकरण केले आहे. मात्र घराबाहेर केवळ अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याची परवानगी आहे. तसेच घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंतच जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यापेक्षा लांब गेल्यास कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी सोमवारी सकाळपासून पोलिसांकडून शहरातील विविध महामार्गांवर नाकाबंदी करत सर्व गाड्यांची तपासणी करत होते. त्यामुळे नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या होत्या. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर मुंबईत हळूहळू काही उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे नागरीक कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, आतापर्यंत प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू न  झाल्याने फक्त कर्मचार्‍यांना कामावर जाण्याकरिता एसटी महामंडळ आणि बेस्टच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे. सोमवारी मुंबई उपनगर, दहिसर, भाईंदर, ठाणे या भागातील शेकडो नागरीक कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेला निघाले होते. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणार्‍या गाड्यांची संख्यादेखील वाढली आहे. पोलिसांनी या सर्व गाड्यांची तपासणी सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. या कोंडीत एसटी आणि बेस्टच्या बसेस अडकून पडलेल्या होत्या.

आगारात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा  

- Advertisement -

सोमवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना तासन्तास बस स्टॉप आणि आगारात बसेसची वाट पाहावी लागली. सकाळी निघालेल्या बसेस वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्या वेळेवर आगारात आल्या नाहीत. त्यामुळे आगारातसुद्धा बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही प्रवाशांनी वैतागून नालासोपारा आगारात गदारोळ सुद्धा केला. मात्र बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. नंतर तब्बल ३ तासांनंतर मुंबईकडे जाणार्‍या बसेस सोडण्यात आल्या.

एसटी आणि बेस्टला तोटा

कोरोनामुळे आधीच एसटी महामंडळ एक हजार कोटींपेक्षा जास्त तोट्यात गेले आहे. त्यात आता इंधनाच्या (डिझेल) दरामुळे एसटी आणि बेस्टचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी एसटीच्या  मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून मोठ्या प्रमाणात बसेस सुरु आहेत. तसेच बेस्टच्या  बसेस सुद्धा रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात एसटीला महसूल मिळत होता. मात्र, आता वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा खर्च वाढलेला आहे, तसेच बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे असल्याने प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यात आता पोलिसांच्या नाकाबंदीमुळे पूर्णतः एसटीच्या तोट्यात वाढ होणार आहे.

 कर्तव्यावर जाण्यासाठी नालासोपारा आगारात 11 वाजता बस पकडण्यासाठी आलो होतो. मात्र तब्बल तीन तास झाल्यानंतर सुद्धा  एकही बस उपलब्ध झालेली नाही. 200 पेक्षा जास्त प्रवासी रांगेत उभे होते. मात्र आगारातून एकही बसेस सोडण्यात आलेली नाही.आम्ही सर्व प्रवाशांनी आगारातील अधिकार्‍यांना विचारणा केली असता वाहतूक कोंडीमुळे बसेस रस्त्यात अडकल्या असल्याची माहिती दिली, नंतर 2 वाजता बसेस सोडण्यात आल्या. शासनाने यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे अन्यथा नागरिक रस्त्यांवर उतरतील.
– परमेश पराडकर,  प्रवासी, नालासोपारा 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -