मालाडमधील सेंट एन्स शाळेची घंटा एकच दिवस; विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास नकार

सेंट एन्स शाळेतील पॅरेंट-टीचर्स असोसिएशन (पीटीए) व शाळा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास ठामपणे नकार दिला.

School Reopen: students Welcome to the school with flowers and Flowers

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोमवारी मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये घंटा वाजली. मात्र मालाडमधील सेंट एन्स या शाळेतील घंटा फक्त सोमवारपुरतीच वाजली आहे. मालाड कोरोनामुक्त झाल्याशिवाय शाळा भरवण्यात येऊ नये असा पवित्रा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेत शाळा सुरू करण्यास विरोध केला. त्यामुळे आता ही शाळा थेट दिवाळीनंतरच सुरू होणार असून मंगळवारपासून नियमितपणे ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका आयुक्तांनी ४ ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली. ही मंजुरी देताना पालकांची संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सेंट एन्स शाळेतील पॅरेंट-टीचर्स असोसिएशन (पीटीए) व शाळा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास ठामपणे नकार दिला. यामध्ये शाळेच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा कोणालाही क्वारंटाईन केलेले नाही, यासंदर्भातील अहवाल पालिकेकडून आम्हाला मिळालेला नाही. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे तसेच शिक्षकांचे अद्याप पूर्णत: लसीकरण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे हे धोकादायक असून, त्यांच्या जीवावर बेतणारे असल्याचा दावा पीटीएच्या बैठकीत पालकांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही त्यांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे ठाम मत सर्व पालकांनी पीटीएच्या बैठकीत मांडले.

शाळा सुरू करण्यासाठी जोपर्यंत संपूर्ण मालाड कोरोनामुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला. त्यामुळे अखेर शाळा प्रशासनाने माघार घेत ४ ऑक्टोबरला एक दिवस शाळा भरवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत पुन्हा पीटीएची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. त्यानंतरच शाळा सुरू करण्यात येईल, असेही ठरले असल्याचे शाळेतील शिक्षिका नीता वाघ यांनी सांगितले. शाळा जरी ऑनलाईन चालणार असली तरी शिक्षकांना शाळेतील दैनंदिन कामासाठी शाळेत हजेरी लावावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.