सेंट जॉर्ज, जी.टी. आणि कामा रुग्णालये पुन्हा कोविड समर्पित

मुंबईतील राज्य सरकारची सेंट जॉर्ज, जी.टी. आणि कामा ही तीन प्रमुख रुग्णालये सर्वसाधारण रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आली होती.

G.T.Hospital

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर कोविड समर्पित रुग्णालये सर्वसाधारण रुग्णसेवेसाठी खुली करण्यात आली होती. त्यात मुंबईतील राज्य सरकारची सेंट जॉर्ज, जी.टी. आणि कामा ही तीन प्रमुख रुग्णालये सर्वसाधारण रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना रुग्णवाढ सतत होत असल्याने राज्य सरकारने ही तिन्ही रुग्णालये पुन्हा संपूर्ण कोविड समर्पित केली आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना उपचार व खाटा कमी पडू नयेत, यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबईतील जे.जे. रुग्णालय समुहातील रुग्णालये पुन्हा कोविड रुग्णसेवेत समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जी.टी., सेंट जार्ज आणि कामा ही तीन रुग्णालये कोविड समर्पित करण्याबरोबरच आणि त्यातील डॉक्टर व कर्मचारी यांनाही कोविड ड्युटी लागू केली आहे. त्यामुळे जी.टी. रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तिन्ही रुग्णालये संपूर्ण कोविड सेवेत दाखल करण्याचा निर्णय आठवड्यापूर्वी घेण्यात आला. या तिन्ही रुग्णालयात १६० बेड कोविड रुग्णासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.