घरमुंबईसेंट जॉर्ज, जे.जे. हॉस्पिटलांनी पैसे थकवले; औषध पुरवठादाराचे आत्महत्येचे पत्र

सेंट जॉर्ज, जे.जे. हॉस्पिटलांनी पैसे थकवले; औषध पुरवठादाराचे आत्महत्येचे पत्र

Subscribe

शीतल मेडिकल स्टोअरच्या मालक दक्षाबेन लक्ष्मीचंद शहा यांनी मुख्यमंत्री तक्रार कक्षाकडेही तक्रार केली, मात्र त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या शहा यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला

हाफकिन बायो फार्मास्युटिकलने देयक थकवल्याने नुकतेच एका औषध पुरवठादाराने आत्महत्या करण्यासंदर्भातील पत्र सरकारला पाठवल्यानंतर तातडीने त्याची देयके मंजूर करण्यात आली. त्यानंतर आता जे.जे. हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलला औषध पुरवठा करणार्‍या पुरवठादाराने आत्महत्येचे पत्र पाठवले आहे. यामध्ये त्याने माझी देयके मंजूर न केल्यास माझे व माझ्या कुटुंबियाचे काही वाईट झाल्यास त्याला जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक कारणीभूत असतील, असे पत्र वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे (डीएमईआर) सचिवांना पाठवले आहे.

डीएमईआरकडून औषध पुरवठा होण्यास विलंब होत असल्यास तसेच काही अडचण असल्यास हॉस्पिटलांना स्थानिक पातळीवर औषध खरेदीची परवानगी असते. त्यानुसार वर्षातून अनेकदा रुग्णालये स्थानिक पातळीवर लिलावाच्या माध्यमातून किंवा थेट औषधे खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे जे.जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय स्थानिक पातळीवर शीतल मेडिकल स्टोअरकडून औषधे खरेदी करतात. यामध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटलने आतापर्यंत शीतल मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअरकडून २०१५ पासून आतापर्यंत ९० लाख ८६ हजार १७१ किमतीची तर, जे.जे. हॉस्पिटल प्रशासनाने २०१६ पासून ५ लाख ३७ हजार १७७ रुपये किमतीची औषधे खरेदी केली आहेत. दोन्ही हॉस्पिटलांची मिळून ९६ लाख २३ हजार ३४८ इतकी थकबाकी झाली आहे. यातील काही रक्कम जे.जे. हॉस्पिटलकडून २०२० मध्ये देण्यात आली. मात्र उर्वरित सर्व रक्कम अद्यापही शीतल मेडिकल स्टोअरला मिळाली नाही. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर फक्त तोंडीच आश्वासन दिले जात असल्याने शीतल मेडिकल स्टोअरच्या मालक दक्षाबेन लक्ष्मीचंद शहा यांनी मुख्यमंत्री तक्रार कक्षाकडेही तक्रार केली, मात्र त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या शहा यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र डीएमईआरचे सचिव, जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता व सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक यांना पाठवले आहे.

- Advertisement -

मी एक ६० वर्षीय वृद्ध विधवा आहे. माझी देयके हॉस्पिटल प्रशासनाकडून थकवण्यात आली आहेत. त्यातच सध्या असलेली कोरोनाची परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण यामुळे मानसिक तणावाखाली वावरत आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात माझी देयके आणि त्यावर १८ टक्क्यांनी व्याज अशी सर्व रक्कम मला देण्यात यावी. अन्यथा माझे किंवा माझ्या कुटुंबियांचे काही झाल्यास त्याला डीएमईआर, जे.जे. हॉस्पिटल व सेंट जॉर्ज हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असेल, असे शीतल मेडिकल स्टोअरच्या मालक दक्षाबेन लक्ष्मीचंद शहा यांनी पत्रात म्हटले आहे.

शीतल मेडिकल स्टोअरच नव्हे तर अन्य औषध पुरवठादारांचीही देयके थकीत आहेत. ही थकीय देयके देण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पुरवणी मागणीअंतर्गत पत्रव्यवहार केला आहे. अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर झाल्यास पुरवठादारांची थकीत देयके तातडीने देण्यात येतील.
– डॉ. आकाश खोब्रागडे, अधीक्षक, सेंट जॉर्ज हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -