घरमुंबईदिव्यांगांच्या गांधीगिरीला यश

दिव्यांगांच्या गांधीगिरीला यश

Subscribe

अखेर तीन महिन्यानंतर मिळणार स्टॉलचे करारपत्र

ठाणे पालिका हद्दीतील दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी ठामपाकडून स्टॉलचे वाटप करण्याचे आदेश तीन डिसेंबर रोजी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. मात्र, मान्यता मिळाली नसल्याचे कारण करुन संबंधित विभागाकडून अनामत रक्कम न स्वीकारुन करारपत्र केले जात नव्हते. या विरोधात मंगळवारी बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना आणि हमराही एजुकेशन अ‍ॅन्ड चेरीटेबल ट्रस्ट चे राष्ट्रीय महा सचिव मोहम्मद यूसुफ फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी ६ मार्चपासून अनमात रक्कम स्वीकारण्यात येेईल, असे आश्वासन दिले आहे.

जागतिक दिव्यांग दिनी म्हणजेच 3 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 1000 दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी स्टॉल देण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आलेली नव्हती. आपण निर्धारित केलेल्या 1000 दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या उद्दीष्टापैकी केवळ 316 जणांना स्टॉल देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. मात्र, या स्टॉलचे करारपत्र करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून दाखवली जात नाही. स्टॉलचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांकडून 1 हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येणार होती. मात्र, ही रक्कम संबधित अधिकार्‍यांकडून स्वीकारली जात नव्हती. त्यामुळे अनेक दिव्यांगांना रोजगाराच्या अधिकारांपासून वंचित रहावे लागत होते.

- Advertisement -

या संदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार केल्यानंतरही कार्यवाही केली जात नसल्याने मंगळवारी बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना आणि हमराही एज्युकेशन अ‍ॅन्ड चेरीटेबल ट्रस्ट च्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी ठामपामध्ये जाऊन अनेक अधिकार्‍यांना गुलाबाचे फूल देऊन कार्यवाहीची मागणी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेत 6 मार्चपासून करारपत्र करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -