घरमुंबईप्रदेश काँग्रेसला लवकर मिळणार नवीन प्रभारी; एच. के. पाटील कर्नाटकच्या मंत्रिमंडळात

प्रदेश काँग्रेसला लवकर मिळणार नवीन प्रभारी; एच. के. पाटील कर्नाटकच्या मंत्रिमंडळात

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला लवकरच नवीन प्रभारी मिळणार आहेत. विद्यमान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. यामुळे काँग्रेसमधील एक नेता एक पद या नियमानुसार एच. के. पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी पक्षातील लवकरच एका नव्या नेत्याची वर्णी लागणार असे समजते. (H. K. With Patil moving to the Karnataka cabinet, the state Congress will soon get a new in-charge)

एच. के. पाटील काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते आहेत. कर्नाटकमधील ग्रामीण भागात एच. के. पाटील यांची चांगली पकड आहे. यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईत काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी एच. के. पाटील यांची काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पाटील हे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या जवळचे असल्यामुळे राहुल गांधींचे यामाध्यमातून महाराष्ट्रावर विशेष लक्ष असेल अशी चर्चा होती, परंतु त्यांची आता कर्नाटकमधील मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेस प्रभारीपदी आता नव्या नेत्याची निवड काँग्रेसला करावी लागणार आहे.

- Advertisement -

सध्या प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. वरिष्ठ नेत्यांनी नुकताच दिल्ली दौरा करुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे, तर विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये झालेल्या पक्षातील राजकारणामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे चव्हाट्यावर आली होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाच्या अनेक घटना चव्हाट्यावर आल्या तरी प्रभारी असणार्‍या पाटील यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न करत स्थिती सावरून घेतली होती, परंतु परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींचा होता. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

एच. के. पाटील यांना अनुभव नसतानाही महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले होते. त्यांच्यापुढे प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी रोखण्याचे आव्हान होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात यासाठी पूर्ण प्रयत्न केले, परंतु कर्नाटच्या मंत्रिमंडळात ते सहभागी झाल्यामुळे त्यांना आता हे पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे लवकरच प्रदेश काँग्रेसला नवीन प्रभारी मिळणार आहेत. नवे प्रभारी कोण असतील? कोणाच्या जवळचे असतील? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रीय काँग्रेसकडून नेहमीच ज्येष्ठ नेत्यांना प्रदेश काँग्रेसचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. यामध्ये जी. के मूपनार, माधवराव शिंदे, वायलर रवी, मार्गारेट अल्वा, मल्लिकार्जुन खर्गे आणि यानंतर एच. के. पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली होती. नव्या प्रभारींना महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करावे लागणार आहे. तसेच जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून ज्येष्ठ नेत्यालाच पुन्हा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी करण्यात येईल, परंतु हा नेता प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी मोडीत काढणार का? हा खरा प्रश्न आहे.

नवीन प्रभारी हायकमांड नेमणार
काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, नवीन प्रभारी नेमणार की नाही? हा सर्वस्वी केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय होईल. अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. याबाबत आम्हला मतप्रदर्शित करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे हे सुद्धा म्हणाले की, नवीन प्रभारी कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार हायकमांडचा आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष याबाबतचा निर्णय घेतली. सध्या एच. के. पाटील हेच प्रदेश काँग्रेस प्रभारी आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -