मनोरंजन होणार Unlock; राज्य सरकारची चित्रीकरणाला परवानगी!

film shooting

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात चित्रपट, मालिका अशा कोणत्याही मनोरंजनात्मक गोष्टींचं चित्रीकरण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं. अनेक चित्रपटांचं अगदी काही दिवसांचं चित्रीकरण देखील अडकलं होतं. याशिवाय कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वात काम करणारे कलाकार किंवा पडद्यामागचे कर्मचारी अशा सगळ्यांनाच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. शनिवारी केंद्र सरकारने लॉकडाऊन ५.० आणि अनलॉक १.० जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारने राज्यातल्या सामान्य जनतेसाठी अनलॉक १, २ आणि ३ या फेजसाठी घोषणा केल्या. त्यानंतर आता मनोरंज विश्वासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून चित्रीकरणाला आणि त्याच्याशी संबंधित इतर सर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. यानुसार आता निर्मात्यांना निर्मितीपूर्वीची (Pre Production) आणि निर्मितीनंतरची (Post Production) कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार करता येतील. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सूचना यासाठी लागू राहतील.

या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल.