घरठाणेमुंबई आणि ठाणेकरांसाठी निर्णयांचा पाऊस

मुंबई आणि ठाणेकरांसाठी निर्णयांचा पाऊस

Subscribe

राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शनिवारी मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगर क्षेत्रात विविध महत्त्वाचे विकासकामांचे प्रकल्प राबविण्यासाठी एमएमआरडीएला ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली. त्यामुळे महानगरांतील मेट्रो रेल्वे प्रकल्प, बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड आणि शिवडी-वरळी कनेक्टर आदी महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच मुंबईसह महानगरांतील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे आणि ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेत येथील कोट्यवधी नागरिकांना दिलासा दिला.

मुंबईसह महानगर खड्डेमुक्त

* मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी.

- Advertisement -

* एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अशा अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यान्वित कराव्यात. या टीम २४ तास खड्डे बुजवण्याचे काम करतील. खड्डे भरण्यासाठी दर्जेदार सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरण्यात यावेत.

* खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना चांगली माहिती असते. त्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांकडून माहिती घेत राहा. पोलिसांनीही या यंत्रणांच्या संपर्कात राहून रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत.

- Advertisement -

* विशेषतः जेएनपीटी आणि अहमदाबादकडून येणार्‍या वाहतुकीचे नियंत्रण करा. एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांनी त्यांचे अंतर्गत रस्तेही खड्डेमुक्त राहतील याची काळजी घ्यावी.

* एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प-रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबविण्यात यावा. त्यासाठी दीर्घकालीन असे नियोजन करण्यात यावे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा.

* बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास, सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारच्या नियोजनासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात यावा. यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी, संबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे.

* एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह ठाणे, नवी मुंबई तसेच शीळफाटा, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशा सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी अशा उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेत.

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी

* ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय. जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ पुढील कार्यवाही करावी.

* ठाणे मनपाबरोबर कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

* भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामांना गती द्या.

* मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सूर्या धरणातून २१८ दशलक्ष लिटर पाणीसाठा करण्याबाबत एमएमआरडीएने तत्काळ कार्यवाही करावी. तसेच उल्हासनगर मनपाचाही पाणीप्रश्न सोडविण्याठी एमआयडीसीने योग्य ते नियोजन करावे.

* काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ३३६ कोटी निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश.

* काळू धरणाच्या उभारणीसाठी मुरबाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील १८ गावे आणि २३ पाड्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. तसेच वन विभागाची ९९९ हेक्टर जमीनही या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहे. या सर्व जमिनीच्या भूसंपादनासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात ३३६ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, ज्यायोगे भूसंपादन विहित वेळेत पूर्ण होऊन धरणाच्या कामाला गती येईल.

* काळू धरणातून ११४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाच्या उभारणीमुळे ठाणे, भिवंडी निजामपूर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका या शहरांची भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -