एसटी बसेसना…दे धक्का

शहापूर एसटी आगारातील गाड्यांची स्थिती, तुटलेले दरवाजे,फाटलेल्या सीट,फुटलेल्या खिडक्या

प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या शहापूर एसटी आगारातील बहुतांश बस नादुरस्त स्थितीत आहेत. सीट ठिकठिकाणी फाटलेल्या, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या तर दरवाजे मोडकळीस आलेले अशी भयानक परिस्थिती शहापूर आगारातील कित्येक बसेसची आहे.

शहापूर एसटी आगारातील बसची अवस्था मोठी दयनीय आहे. एकूण 54 बसेस आगारात आहेत. यातील 6 बसेस लांबपल्ल्यांवर धावतात. तर काही बसेस तालुक्यातील ग्रामीण भागात किन्हवली, डोळखांब, चोंढे, शेणवे, टाकिपठार खरांगण, कानवे, आपटे, आस्नोली तर भिवंडी, मुरबाड, वाडा, कसारा या मार्गावर चालविल्या जात आहेत. आगारातील बहुतांश बसेस 10 लाख किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यावर धावल्याने यातील बर्‍याच बस भंगार व कालबाह्य झालेल्या आहेत. धोकादायक झालेल्या या बसेसमधून ग्रामीण प्रवासी वाहतूक सरार्सपणे सुरुच आहे.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचे नियम धाब्यावर बसवून ग्रामीण प्रवासी वाहतूक सुरू आहे एकिकडे बसची ही दैन्यवस्था आहे तर दुसरीकडे शहापूर एसटी आगारास रोज 3 लाख रुपये उत्पन्न असताना देखील प्रवाशांना प्रचंड असुविधांना तोंड दयावे लागत आहे. प्रवशांना नादुरुस्त अशा कालबाह्य झालेल्या भंगार बसमधून प्रवास करावा लागत आहे. रोजच्या बिघाडामुळे कित्येक बसेस वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी दाखल होत आहेत. अशा कालबाह्य झालेल्या बसची अवस्था फारच बिकट आहे. रोज नादुरुस्त होणार्‍या या बस रस्त्यात कधी बंद पडतील, याची शाश्वती वाहनचालकही देऊ शकत नाहीत. आगारातील कित्येक बस तर धक्का मारून सुरू कराव्या लागत आहेत. अनेक बसेसना काही वेळा बसमधील वाहक आणि प्रवाशांनाच धक्का मारावा लागत आहे.