मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय लक्षणीय वाढ

Steady rise in coronavirus cases in Mumbai in past couple days, shows data
मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोनाबाधित संख्येत होतेय लक्षणीय वाढ

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आता हाच अंदाज प्रत्यक्षात खरा होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातले असून संसर्गाची दुसरी लाट आली आहे. दिल्लीत दिवसाला पाच ते आठ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे सध्या दिल्लीप्रमाणे मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत मागील चार दिवसांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसात एका हजारांहून अधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईत मागील चार दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८७१ वरून १ हजार ९२वर झाली आहे. म्हणजेच जवळपास मुंबईत रुग्णसंख्येने ११०० उंबरठा ओलांडला आहे. १८ नोव्हेंबरला मुंबईत ८७१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर १९ नोव्हेंबरला ९२४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर २० नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबरला अनुक्रमे १ हजार ३१ आणि १ हजार ९२ कोरोनाबाधित आढळले. म्हणजेच २० नोव्हेंबरला मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या हजार पार झाली. त्यामुळे सध्या दिल्लीप्रमाणे मुंबईत कोरोनाचा कहर होऊन परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल एका मुलाखतीत म्हणाले की, ‘पुढील तीन ते चार आठवडे मुंबईकरिता खूप महत्त्वाचे आहेत. या तीन ते चार दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच अनेक निर्णय घेण्यात येतील. स्विमिंग पूल, शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्याबाबात नियोजन करण्यात आले होते. पण आता तिन्ही गोष्टी बंद राहतील. सध्या अन्य ठिकाणावर कोणताही परिणाम होणार नाही.’


हेही वाचा – राऊतांचा मोदींना सल्ला, ‘महाराष्ट्रातील स्वपक्षीयांना एवढे सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडले’