ब्लू फिल्म दाखवून मुलींचा विनयभंग; सावत्र बापाला अटक

man arrested for raping girl

तेरा आणि चौदा वर्षांच्या दोन मुलींशी त्यांच्याच सावत्र बापाने ब्ल्यू फिल्म दाखवून अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रकरण उजेडात आणले

सदर प्रकरणात तक्रारदार महिला या मालाड, मालवणी परिसरात राहत असून एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना एका व्यक्तीने फोन करुन जोगेश्वरी परिसरातील एक सावत्र बाप आपल्या मुलींशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती दिली होती. दोन मुलींना तिचा सावत्र बाप मोबाईलवरुन ब्ल्यू फिल्म दाखवून रात्रीच्या वेळेस त्यांच्याशी अश्लील वर्तन करुन विनयभंग करतो. त्यामुळे त्यांनी या मुलींची सुटका करुन नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्यांकडे केली होती.

ही माहिती ऐकून सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांना धक्काच बसला. त्यानंतर दोन दिवसांनी ते त्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या संस्थेच्या कार्यालयात आले. यावेळी या दोन्ही मुलींनी त्यांचे सावत्र पिता त्यांचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सावत्र पिता या दोन्ही मुलींशी अश्लील वर्तन करुन त्यांचा विनयभंग करीत आहेत. या घटनेनंतर या दोन्ही मुलींच्या आईशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी बालकल्याण समितीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे ते सर्वजण मानखुर्द येथील बालकल्याण समितीकडे गेले. तिथे त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आदेश देऊन दोन्ही मुलींना अंधेरीतील एका सामाजिक संस्थेकडे सोपविण्यास सांगण्यात आले होते. या घटनेनंतर त्यांनी मंगळवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात सावत्र पित्याविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी या महिलेसह दोन्ही मुलींची पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता. त्यांच्या जबाबानंतर पोलिसांनी सावत्र पित्याविरुद्ध विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

अखेर त्या नराधमास अटक

गुन्हा दाखल होताच रात्री उशीरा या सावत्र पित्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने गेल्या चार वर्षांत या दोन्ही मुलींना ब्ल्यू फिल्म दाखवून रात्रीच्या वेळेस त्यांच्याशी अनेकदा अश्लील वर्तन केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले, यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही मुलींच्या वडिलांचे निधन झाले होते, असे प्राथमिक तपासात लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या आईने चार वर्षांपूर्वी आरोपीसोबत विवाह केला होता. त्यानंतर ते सर्वजण एकत्र जोगेश्वरी परिसरात राहत होते. याच दरम्यान त्याने या दोन्ही मुलींना मोबाईलवरुन ब्ल्यू फिल्म दाखविण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळेस त्याचे कपडे काढून तो त्यांच्याशी अश्लील चाळे करीत होता. हा प्रकार त्यांनी कोणालाही सांगू नये म्हणून तो त्यांना जिवे मारण्याची धमकी देत होता. अनेकदा याच कारणावरुन त्याने त्यांच्यासह आईला मारहाण केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.