घरमुंबईभिवंडीतील 'त्या' मंदिराच्या विश्वस्तांविरोधात 'आमरण उपोषण'

भिवंडीतील ‘त्या’ मंदिराच्या विश्वस्तांविरोधात ‘आमरण उपोषण’

Subscribe

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थेमधील विश्वस्तांच्या मनमानी कारभारालाविरोध करत संघर्ष समितीने आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थेमधील विश्वस्तांच्या मनमानी कारभारालाविरोध करत संघर्ष समितीने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांना प्राथमिक सुखसुविधा पुरविण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल देवरे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

या आहेत मागण्या

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या स्वामी नित्यानंद महाराज समाधी मंदिराचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पहिले ते बारावी पर्यंतची मोफत शिकवणी वर्ग बंद केले आहेत. तसेच अनेक वर्षांपासून येणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडी ना मंदिरा मध्ये गाभाऱ्यापर्यंत असणारा प्रवेश विद्यमान विश्वस्त मंडळाने बंद केला आहे. गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी आणि वसंत पंचमी या महत्त्वाच्या उत्सवा दरम्यान गाभाऱ्या मध्ये चरणस्पर्शचे पारंपरिक दर्शन बंद केले आहे. तसेच भाविकांच्या लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, संस्थेचा कचरा, अन्नपदार्थ टाकावू वस्तू येथील तानसा नदीत टाकून नदीपात्र दूषित करणे, शौचालय बंद करून भाविकांना मूलभूत सुविधा न देणे आदी मागण्या केल्या आहेत. मात्र या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यात आणखी भर म्हणजे स्थानिक पोलिसांना हाताशी धरून ग्रामपंचायतीला देखील न जुमानता काही दिवसांपूर्वी सुनील देवरे यांचे गावठाण जागेत केलेल्या बांधकामाच्या पायाचे बांधकाम स्थानिक ग्रामपंचायतीच्या परवानगी विना कुठलीही पूर्व कल्पना न देता विश्वस्तांनी पोलिसांच्या मदतीने तोडून टाकले आहे. अशा हुकूमशाही पद्धतीने येथील संस्थेचे विश्वस्त वागत असल्याची तक्रार देवरे यांनी धर्मदाय आयुक्त मुंबई आणि ठाणे यांना केली असून अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली जात नसल्याने अखेर न्याय हक्कासाठी गणेशपुरी येथे शुक्रवार पासून आमरण उपोषणाला सुरु आहे.

- Advertisement -

विश्वस्त मंडळाच्या कारभाराची चौकशी करावी. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत. येथे येणाऱ्या भक्तांना प्राथमिक सुखसुविधा मिळाव्यात याबाबत स्पष्ट आदेश कोणीही देत नाही तोपर्यंत आपले उपोषण आपण मागे घेणार नसल्याचे सुनील देवरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, भीमेश्वर सद्गुरु नित्यानंद संस्थेचे विश्वस्त परशुराम सावंत यांना या उपोषणाबाबत विचारणा केली असता देवरे आणि शासकीय यंत्रणा यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केले नसल्याचे सांगितले आहे. परंतु उपोषणकर्ते सुनील देवरे यांनी स्थानिक पातळी पासून जिल्हास्तरावर सर्व संबंधितांना या बाबत कळविले असल्याचे सांगितले. परंतु चोवीस तास उलटून गेली तरी या आंदोलनाची दखल तहसीलदार कार्यालयाने घेतली नसल्याची खंत देवरे यांनी बोलून दाखविली आहे. या आंदोलनास असंख्य राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, ग्रामस्थ यांचा पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -