बेस्टच्या कंत्राटी बसचालकांचा संप सुरूच ; मात्र प्रवाशांचे हाल

Bus drivers

बेस्ट परिवहन विभागात भाडे तत्वावर बसगाड्या चालविणाऱ्या बस चालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सलग तिसऱ्या आपला संप चालूच ठेवला आहे. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

दरम्यान, बेस्ट प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी कळविले आहे. कंत्राटातील अटीनुसार संबंधित कंत्राटदार व्यवसाय संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाद्वारे दररोज बस गाड्या चालविल्या जात आहेत, असे बेस्ट उपक्रमाने कळविले आहे.

बेस्ट उपक्रमात,कंत्राटी तत्वावर बसगाड्या चालविणाऱ्या बसचालकांना त्यांचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधी देण्याबाबत कंत्राटदार हलगर्जीपणा करीत असल्याची संप करणाऱ्या बसचालकांची तक्रार आहे. कंत्राटदाराकडे अनेकदा थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीबाबत सतत रेटा लावूनही त्यांची दखल घेण्यात येत नसल्याने अखेर ‘एटीसी ग्रुप’ आणि ‘एमपी ग्रुप’ च्या बसचालकांनी रविवारपासून संपाचे हत्यार उपसले. मात्र, बेस्ट प्रशासनाला यशस्वी तोडगा काढण्यात अद्यापही यश आलेले नाही.