घरमुंबईस्ट्रक्चरल ऑडिट कंपनीचे अंधेरीत कार्यालयच नाही!

स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीचे अंधेरीत कार्यालयच नाही!

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनीचे नाव चर्चेत आले असले तरी प्रत्यक्षात ही कंपनी मोठी नाही. पुलांच्या बांधकामाबाबतचा या कंपनीला कोणताही अनुभव नव्हता. तरीही महापालिकेत या कंपनीला शिरकाव करु देण्यासाठी निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला. गुणांच्या आधारे निवड करण्याऐवजी कमी बोली लावणार्‍या या कंपनीला काम देण्यात आले. त्याआधारेच या कंपनीला शहरातील ३९ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम दिले. मात्र रजिस्टर्ड ऑफ कंपनीज्मध्ये देसाई यांनी (पत्ता- फ्लॅट क्रमांक १८, चौथा मजला, इमारत क्रमांक-१९/बी, जी. डी पाटील इमारत, दाऊद बाग लेन) अंधेरी पश्चिमेच्या कार्यालयाचा पत्ता दिला आहे. मात्र, अंधेरीत देसाई कंपनीचे कार्यालयच नसल्याचे खात्रीलायक समजते.

पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर या कंपनीच्या संचालकांवर कार्यालयासह घरे सोडून पोबारा करण्याची वेळ आली आहे. कंपनी अ‍ॅक्टप्रमाणे नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता खोटा असून त्याठिकाणी कार्यालय नाही. उलट ज्या दोन ठिकाणी ते राहत होते, ती घरेही जानेवारीपासून बंद असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

महाड येथील सावित्री नदीच्या पुल दुघर्टनेनंतर मुंबईतील ३७६पैकी २७६ पूल,पादचारी पूल, उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कंपनीकडून निविदा मागवल्या होत्या. यामध्ये शहरातील ३९ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट कंपनीची पात्र कंपनी म्हणून निवड करण्यात आली. त्यांना ६३.१८ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने डिसेंबर २०१६ पर्यंत पुलांचे ऑडिट करून त्या सर्वांचा अहवाल महापालिकेला सादर केला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर बनवण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनीला दोषी ठरवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. तसेच या कंपनीचे सर्व पैसे थांबवण्याबरोबरच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचेही निर्देश दिले होते. परंतु या कंपनीबाबत धक्कादायक माहितीसमोर येत आहे. या कंपनीने ज्या नोंदणीकृत पत्त्यावर कार्यालय दर्शवले होते. त्या जी.डी. पाटील बिल्डींग, दाऊद बाग लेन अंधेरी पश्चिम येेथे कार्यालय नसून त्याचा रहिवासी वापर होत आहे. पर्ल हेरिटेज येथे कार्यालय असून जानेवारीपासून ते बंद आहे. त्यामुळे मुंबईत नोंदणीकृत कार्यालय नसलेल्या कंपनीला महापालिकेने लाखो रुपयांचे काम कशाच्या आधारे दिले याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

आजवर पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नेमण्यात येणार्‍या कंपन्यांच्या कामांच्या दर्जानुसार व अनुभवानुसार गुण दिले जातात. त्या गुणांनुसार पात्र कंपनीची निवड केली जाते. परंतु याठिकाणी गुणांऐवजी कमी बोली लावणार्‍या कंपनीची निवड करून त्यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने कधीही पुलांची कामे केलेली नव्हती. या माध्यमातून त्यांनी प्रथमच महापालिकेत प्रवेश केला होता. त्यांना महापालिकेत प्रवेश देण्यासाठी नियमात बदल करण्यात आला होता आणि त्यानुसारच हे काम दिले होते. परंतु पहिल्याच कामात त्यांना फटका बसला. दरम्यान या कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याने कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते,असे बोलले जात आहे. आझाद मैदान पोलिसांनी महापालिकेतून निलंबित अधिकार्‍यांसह स्ट्रक्चरल ऑडिट करणार्‍या कंपनीचे पत्ते मिळवले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणाची आहे डी. डी. देसाई कंपनी
डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट ही कंपनी २००३ ची नोंदणीकृत आहे. या कंपनीचा संचालक निरजकुमार देसाई हे गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत होते. तर त्यांचे वडील प्राध्यापक दिलीपकुमार देसाई आहेत. त्यांच्या नावानेच ही कंपनी आहे. निरज कुमार देसाई हे ४० ते ४२ वयाचे असून यांनी २०१३-१४ मध्ये गॅमन इंडियाची नोकरी सोडून पूर्णपणे या क्षेत्रात झेप घेतली. परंतु तोवर त्यांनी कधीही महापालिकेचे काम मिळवले नव्हते. पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचेही त्यांचे हे पहिलेच काम होते. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी ठरले.

ऑडिटमधील शेरे
चांगल्या स्थितीतील पुलं : १२
मोठ्या स्वरुपातील दुरुस्तीची पुले : ९
किरकोळ दुरुस्तीची पुले : १५
पाडण्यात येणार्‍या पुलांची संख्या : ३

डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनी
शहर भागातील एकूण पुलांची संख्या: ३९
एकूण कंत्राटाची रक्कम : ६३.१८ लाख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -