घरमुंबईऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचा धुमाकूळ, शिक्षक हैराण

ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचा धुमाकूळ, शिक्षक हैराण

Subscribe

ऑनलाईन वर्गात आंगतूक विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि शिक्षकांबद्दल अर्वाच्च भाषेत संवाद व मेसेजचा भडिमार होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून वाढू लागल्या आहेत.

ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सुरुवातीला मोबाईलला नेटवर्क नसणे, मोबाईल नसणे, रिचार्जसाठी पैसे नसणे, कॉम्प्युटर, लॅपटॉप, वीज अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. परंतु आता ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षकांना आणखी नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत. ऑनलाईन वर्गात आंगतूक विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि शिक्षकांबद्दल अर्वाच्च भाषेत संवाद व मेसेजचा भडिमार होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून वाढू लागल्या आहेत.

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा एक पर्याय म्हणून वापर करण्यात आला. परंतु या ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षकांना आता एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आजचे विद्यार्थी हे शिक्षकांपेक्षाही अधिक तंत्रस्नेही असल्याने ते विविध पद्धतींद्वारे शिक्षकांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील एका महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने ऑनलाईन वर्गात प्राचार्‍यांच्या नावाने प्रवेश करून शिक्षकाला सूचना दिल्या होत्या. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणारी ऑनलाईन वर्गाची लिंक अनेकदा विद्यार्थ्यांकडून इतरत्र पाठवण्यात येते. त्यामुळे आगंतुक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वर्गात प्रवेश होतो. हे आगंतुक विद्यार्थी त्या शाळेचेच नसतात. तर कधी एका विशिष्ट नंबरचा वापर केवळ अशा उपद्रवासाठी केला जातो. त्यानंतर तो नंबर बंद केला जातो. काही विद्यार्थी शिक्षकांबद्दल अर्वाच्च भाषेत संवाद व मेसेजचा भडिमार करत आहेत. मुंबई उपनगरातील एका शाळेतील शिक्षक या समस्यांनी ग्रासले आहेत. अशा विद्यार्थ्यांना शोधणे हे कठीण काम शिक्षकांना करावे लागते आहे. तसेच या विद्यार्थ्यांना वठणीवर आणण्यासाठी शाळेकडून विशेष समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

विभक्त कुटुंब पध्दती, आई वडील दोघेही व्ययसाय नोकरी निमित्ताने घराबाहेर, समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर पडलेला प्रभाव, युट्यूब, चित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, नेटफ्लिक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅपसारख्या अनेक प्रभावी माध्यमाचा बालमनावर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्यातील शिक्षक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधणार आहेत, अशी माहिती शिक्षक उदय नरे यांनी दिली.

ऑनलाईन टवाळखोरी करणार्‍या या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवणे हा एकमेव उपाय आहे. परंतु शाळेची प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता अशी तक्रार करण्यास शिक्षक व शाळा व्यवस्थापन तयार नसते.
– उदय नरे, शिक्षक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -