घरमुंबईप्लास्टिकची कवळी गिळली, वृद्ध व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया

प्लास्टिकची कवळी गिळली, वृद्ध व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

पाणी पित असताना अचानक दाताची कवळी गिळलेल्या ६० वर्षीय अब्दुल गनी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील झेन मल्टिस्पेशालिटी या खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि कठीण ‘एसोफॅगोटमी’ शस्त्रक्रियेव्दारे अब्दुल गनी यांच्या पोटातून सहा सेंटीमीटरची प्लास्टिकची कवळी काढण्यात आली. सर्वप्रथम त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते.

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘एण्डोस्कोपीच्या’ माध्यमातून ती कवळी काढण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना झेन रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ‘एसोफॅगोटमी’ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर यांच्या टीमने गनी यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची ‘एसोफॅगोटमी’ शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील प्लास्टिकची कवळी अखेर बाहेर काढली.

- Advertisement -

छाती आणि पोटाच्या वरील भागात असह्य वेदना होत असल्याची तक्रार घेऊन अब्दुल गनी रुग्णालयात आले होते. कवळी नेमकी कुठे आहे हे बघण्यासाठी एक्स-रे काढण्यात आला. पण, ती प्लास्टिकची असल्याने एक्स-रेमध्ये दिसत नव्हती. मग छाती आणि पोटाचा सीटीस्कॅन करून कवळी नेमकी कुठे आहे? ते शोधण्यात आले. सहा सेंटीमीटरच्या या कवळीने अन्ननलिका व्यापून टाकल्याने गनी यांना गिळणे आणि श्वास घेणे कठीण जात होते.

“कवळी एण्डोस्कोपीच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नव्हते. कवळी अडकून ४८ तास झाले होते. तसंच, रुग्णाची स्थिती खूपच नाजूक होती, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. कारण, कवळीमुळे छिद्र पडले असते किंवा प्रादुर्भाव झाला असता तर ते प्राणघातक ठरू शकले असते. ”
– डॉ. रॉय पाटणकर, संचालक, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय.

अशी केली शस्त्रक्रिया

या रुग्णाने कवळी गिळली होती आणि त्याचा परिणाम उत्तर अन्ननलिकेतील सर्वांत अरुंद भागावर झाला होता. कारण, त्या कवळीचे आकारमान अन्ननलिकेच्या आकारमानाच्या तिप्पट होते. कवळीला घोड्याच्या खुरासारखा बाक असल्याने अन्ननलिकेच्या पुढील भिंतींशी ती अडकली होती. त्यामुळे अन्ननलिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास अन्ननलिका उचलली जात होती आणि कवळी आणखी पुढे जात होती. त्यामुळे अशा परिस्थितीत नीट पकड मिळत नसेल,तर अन्ननलिका उघडून बाहेरील वस्तू काढणे आणि नंतर अन्ननलिका पुन्हा जोडणे याखेरीज दुसरा पर्याय राहत नाही.

- Advertisement -

त्यामुळे अन्ननलिकेला तोडून त्यात अडकलेली कवडी बाहेर काढून, अन्ननलिकेला पुन्हा जोडण्यात आले. याच प्रक्रियेला ‘एसोफॅगोटमी’ शस्त्रक्रिया असं म्हणतात. असे डॉ. पाटणकरांनी सांगितले. तर,शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्णाला नाकाद्वारे पोटापर्यंत घातलेल्या नलिकेद्वारे द्रव आहार देण्यात आला असून रुग्णाची प्रकृती आता उत्तम आहे.

“रुग्णाची परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती. कारण, त्यांचे वय जास्त होते आणि दुसऱ्या रुग्णालयात कवळी काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. रुग्णाला धूम्रपानाची सवय असल्याने भूल देणे सुद्धा कठीण होते. “
– डॉ. तन्वीर मजीद, थोरिअॅक आँकोसर्जन, झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -