घरताज्या घडामोडीड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयाच्या आगीचा प्रलंबित चौकशी अहवाल पुढील आठवड्यात

ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयाच्या आगीचा प्रलंबित चौकशी अहवाल पुढील आठवड्यात

Subscribe

भांडुप येथील ड्रीम माॅलमध्ये २६ मार्चला भीषण आग लागून या माॅलमधील 'सनराईज' कोविड रुग्णालयातील ९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भांडुप येथील ड्रीम माॅलमधील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला दीड महिना होत आला तरी अद्यापही त्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय गटनेते, सदस्यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारला. त्यावर पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पालिका प्रशासन पुढील आठवड्यात सदर चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे आश्वासन दिले. भांडुप येथील ड्रीम माॅलमध्ये २६ मार्चला भीषण आग लागून या माॅलमधील ‘सनराईज’ कोविड रुग्णालयातील ९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेचे तीव्र पडसाद त्यावेळी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते.

या दुर्घटनेची चौकशी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पुढील १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, अद्याप सदर दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या दुर्घटनेप्रकरणी चौकशी अहवाल अद्याप का सादर करण्यात आला नाही? या दुर्घटनेचे कारण काय? दोषी लोकांवर काय कारवाई करण्यात आली? अशा प्रश्नांची सरबत्ती करत प्रशासनाला चांगलाच जाब विचारला.

- Advertisement -

यावेळी विरार येथील आगीची दुर्घटना घडल्यावर तात्काळ कारवाई झाली आणि सदर घटनेला जबाबदार दोन जणांना अटक झाली. कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. परंतु, मुंबईसारख्या शहरात २६ मार्चला भांडुप येथे आगीची दुर्घटना घडून आज दीड महिना होत आला आणि चौकशीची घोषणा करूनही चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असा मुद्दा उपस्थित करत रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या घटनेनंतर पालिकेने सदर प्रकरणी ओसी रद्द केली म्हणून रुग्णालय व्यवस्थापन पालिकेच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. पालिका आयुक्त कुणाला घाबरून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत? असा सवालही रवी राजा यांनी उपस्थित केला. तसेच, चौकशी अधिकारी प्रभात रहांगदळे हेच अग्निशमन दलाचे प्रमुख असताना सदर रुग्णालयाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडून निष्पक्ष चौकशी कशी होणार? असा सवालही रवी राजा यांनी उपस्थित केला. याप्रसंगी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी चौकशी अहवालाला विलंब झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -