भिमाशंकरमध्ये भाविकांची अंधश्रद्धा उठतेय वृक्षांच्या जिवावर!

झाडांच्या दोन फाद्यांच्यामध्ये ठोकण्यात आलेल्या नाण्यांमुळे मोठी मोठी झाडे मृत्यूपंथाला लागली आहेत.

Superstition of devotees in Bhimashankar on the life of trees!
भिमाशंकरमध्ये भाविकांची अंधश्रद्धा उठतेय वृक्षांच्या जिवावर!

लोक कितीही शिकले, मोठे झाले तरी अंधश्रद्धेवरचा पगडा काही हटत नाहीय. निसर्गाने दिलेल्या सुंदर नवसंपत्तीचा एकीकडे ऱ्हास होत चालला आहे. मोठ्या प्रमाणात वणवे लागणे, चोरून लाकूडतोड करणे, वृक्षतोड करणे, शहरीकरणासाठी जंगलांच्या ऱ्हास करणे यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच आता वृक्षांवर अंधश्रद्धेचे घाव होताना दिसत आहेत. भीमाशंकर अभयारण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भीमाशंकरच्या जंगलातील नागफणी पॉइंट परिसरात शेकडो मोठ्या झाडांना असंख्य धातूचे शिक्के आणि नाणी ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या झाडांच्या दोन फाद्यांच्यामध्ये ठोकण्यात आलेल्या नाण्यांमुळे मोठी मोठी झाडे मृत्यूपंथाला लागली आहेत. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन झाडांना सुळावर चढवीत असल्याचे तिथल्या ग्रामस्थांचे मत आहे. मुरबाड सह्यगिरी एडव्हेंचर या संस्थेमार्फत काही गिर्यारोहक काही दिवसांपूर्वी भीमाशंकर जंगलात फिरण्यासाठी गेले असताना हि बाब त्यांच्या लक्षात आली. भीमाशंकर अभयारण्यात शेकरू म्हणजेच उडत्या खारी मोठ्या संख्येने आढळतात. माणसांच्या अशा बेशिस्त वागण्यामुळे इथल्या वन्यप्राण्यांना याचा धोका निर्माण झाला आहे.

भीमाशंकर अभयारण्यात झाडांना ठोकण्यात आलेल्या नाण्यांमुळे तिथली सगळी झाडे ही विद्रुप दिसायला लागली आहेत. जंगलाच गुप्त धन किंवा मोक्षप्राप्तीसाठी असे प्रकार केले जात असल्याचा अंदाज आहे. काही झाडांच्या मुळांमध्ये नाणी ठोकली असल्याची माहिती गिर्यारोहकांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून जंगलामध्ये अशा प्रकारची अघोरी कृत्ये करण्याचे प्रमाण वाढले आहे. जंगल भागात नियमितपणे गस्त घालून त्याचप्रमाणे तिथल्या भागात लक्ष ठेवून नव विभागाने गैरप्रकार रोखायला हवेत, असे सह्याद्रीत भटकंती करणाऱ्या ज्येष्ठ गिर्यारोहकांचे मत आहे. गेल्या काही वर्षांत जंगलाच्या भागात भट्टी लावून गावठी दारू तयार करून जंगलाच्या चोरट्या मार्गाने ही दारू शहरी भागात विकण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून हे उद्योग केले जातात. जंगलात होणारे हे प्रकार पर्यावरण आणि प्राण्यांसाठी हानिकारक आहेत.


हेही वाचा – मोबाईल मॅप वापरणे पडले महागात, कळसुबाईला निघालेल्या तरूणाचा मृ्त्यू