घरमुंबई'वंशाच्या दिव्यांपेक्षा मुली बऱ्या'; अखेर सुप्रिया सुळेंनी डागली तोफ!

‘वंशाच्या दिव्यांपेक्षा मुली बऱ्या’; अखेर सुप्रिया सुळेंनी डागली तोफ!

Subscribe

राष्ट्रवादीतून शिवसेना आणि भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांचा सुप्रिया सुळेंनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेत जात असलेल्या नेत्यांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर लागली असतानाच दुसरीकडे पक्षांतरामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही की काय? अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना अखेर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. आणि त्यांच्या याच प्रतिक्रियेवर बरीच चर्चा होऊ लागली आहे. नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘वंशाच्या दिव्यांपेक्षा मुलीच बऱ्या’, असं विधान केलं आहे. यावेळी त्यांचा रोख राष्ट्रवादीतून सेना-भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांकडे असल्याचं दिसून आलं.

‘भाजपचं नाव ‘काँग्रेस जनता पार्टी’ करून घ्या!’

पक्षांतर करून नेतेमंडळींना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपवर त्यांनी तोंडसुख घेतलं. ‘भाजपला काँग्रेसमुक्त भारत करायचा होता. पण त्याऐवजी ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच भाजपमध्ये घेत आहेत. त्यामुळे भाजपच काँग्रेसयुक्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपऐवजी ‘काँग्रेस जनता पार्टी’ असं नाव करून घ्यावं’, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षांतरावरही त्यांनी यावेळी टीका केली. ‘सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर पुत्रप्रेमाच्या नावाखाली किंवा स्वार्थासाठी हे नेते दुसऱ्या पक्षात जातात. पण त्यासाठी तिथल्या नवख्या नेत्यांना देखील मुजरा करतात. हे दुर्दैवी आहे. पण आम्ही वंशाच्या दिवा नसलो, तरी आमच्यामुळे आमच्या वडिलांना दुसऱ्यापुढे मुजरा करावा लागत नाही’, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार पत्रकारावर भडकले, माफी मागायला भाग पाडले!

‘म्हणून थोरले पवार भडकले’

दरम्यान, शरद पवार श्रीरामपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारावर भडकल्याचं वृत्त शुक्रवारी चर्चेत आलं होतं. मात्र, ‘एखाद्या ८० वर्षांच्या आपल्या वडिलांच्या वयाच्या नेत्याला एकच प्रश्न किती वेळा तुम्ही विचारणार?’ असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी शरद पवार संतापल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार आजपर्यंत कधीही असे संतापले नव्हते. ते तसे संतापले, त्याला काही कारण होतं’, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्थापनेपासून शरद पवारांसोबत असणारे पद्मसिंह पाटील देखील पक्ष सोडून जात असल्याबद्दल शरद पवारांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर भडकलेल्या पवारांनी ‘नातेवाईकांचा इथे राजकारणात काय संबंध?’ असं विचारत त्या पत्रकारालाच सुनावलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -